नवी दिल्लीः दक्षिण सियाचीनमध्ये हिमस्खलनात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 15 दिवसांतली ही दुसरी घटना आहे. सियाचीनमधल्या 18 हजार फूट उंचावर हिमस्खलन झालेलं समजताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी जवानांची सुटका केली. हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं जवानांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून, या दुर्घटनेत दोन जवानांना प्राणांना मुकावं लागलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलन होऊन बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने चार जवानांचा मृत्यू झाला होता. तसेच दोन पोर्टरचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (18 नोव्हेंबर) दुपारी जवानांची एक तुकडी पेट्रोलिंग करत असताना हिमस्खलन झाले होते. यामध्ये आठ जवान अडकले असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, जवानांना वाचविण्यासाठी लष्कराने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवलं होतं.लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, हिमस्खलनामध्ये पेट्रोलिंग करणारे आठ जवान अडकले. याबाबची माहिती मिळताच लष्कराचे एक पथक जवानांच्या शोधासाठी घटनास्थळी झाले असून, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मात्र, 18000 फूट उंचीवर अडकलेल्या या जवानांचा सुरुवातीला शोध लागला नाही. त्यानंतर यामध्ये चार जवानांसह दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती.