भावाच्या पराभवाचा बदला घेणार, प्रियंका गाधी स्मृती इराणींविरोधात लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 08:16 AM2021-09-15T08:16:41+5:302021-09-15T08:17:50+5:30
प्रियंका गांधींचे प्राधान्य हे अमेठी मतदारसंघाला असून राहुल गांधींच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी बहिणीकडून ग्राऊंड लेव्हलवर जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे, 2024 ला प्रियंका गांधी अन् स्मृती इराणी यांच्यात सामना रंगणार असल्याचे दिसून येते
नवी दिल्ली - आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्याच, पार्श्वभूमीवर 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसदर्भातही विचारविनिमय सुरू आहे. काँग्रेसच्या राजकीय सल्लागार समितीमधील एका सदस्याने लोकमतशी बोलताना आगामी लोकसभा निवडणुकांमधील बदलाबद्दल माहिती दिली. काँग्रेस महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी अमेठी किंवा रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रियंका गांधींचे प्राधान्य हे अमेठी मतदारसंघाला असून राहुल गांधींच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी बहिणीकडून ग्राऊंड लेव्हलवर जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे, 2024 ला प्रियंका गांधी अन् स्मृती इराणी यांच्यात सामना रंगणार असल्याचे दिसून येते. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनीही प्रियंका गांधींना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्येही अमेठी किंवा रायबरेलीतून निवडणूक लढविण्याची सल्ला दिल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली आहे. प्रियंका गांधींचा अमेठी दौरा आणि आगामी निवडणुकांसंदर्भात झालेल्या बैठकीतूनही तेच संकेत मिळत आहेत.
दरम्यान, माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनीही औपचारिकपणे विधानसभा निवडणुकांबद्दल बोलताना, प्रियंका गांधीच उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचा चेहरा असल्याचे म्हटले. सर्वकाही ठीक राहिल्यास प्रियंका गांधींना काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले जाऊ शकते. भाजपच्या योगी आदित्यनाथ यांना टक्कर देण्यासाठी प्रियंकांना पुढे केलं जाऊ शकतं. प्रियंका गांधींनी नुकतेच ट्विटरच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजप सरकारचे खोटे दावे राज्यातील लोकांनी पाहिले आहेत, त्यामुळे नागरिक मुख्यमंत्री आणि सरकार दोघांनाही बदलून टाकतील, असे प्रियंका यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.