गेल्या दोन दिवसापासून विमान प्रवाशांनी वेळेत प्रवास निघत नसल्याचा आरोप सुरू केला आहे. काल याबाबत एका प्रवाशाने वैमानिकाला मारहाण केल्याचे समोर आले होते, या पार्श्वभूमीवर आता दुसरा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्रवासी धावपट्टीवर बसल्याचे दिसत आहे. आता या प्रकरणी एमओसीएने नोटीस पाठवली आहे.
नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने इंडिगो आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस बजावली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल १५ जानेवारी रोजी मध्यरात्री मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पुन्हा इंडिगो! मुंबई विमानतळावर प्रवासी धावपट्टीजवळ बसून जेवले; कालच हल्ल्याची घटना घडलेली
बीसीएएस'ने दिलेल्या नोटीसनुसार, इंडिगो आणि MIAL या दोन्ही कंपन्या परिस्थितीचा अंदाज लावण्यात आणि विमानतळावर प्रवाशांसाठी योग्य सुविधांची व्यवस्था करण्यात अयशस्वी ठरल्या. उदाहरणार्थ, "विमानाला कॉन्टॅक्ट स्टँडऐवजी रिमोट C-33 देण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचा त्रास आणखी वाढला. एवढेच नाही तर त्यांना टर्मिनलवर विश्रांती कक्ष आणि अल्पोपहार यांसारख्या मूलभूत सुविधाही पुरवल्या गेल्या नाहीत.
या प्रकरणी आता मुंबई विमानतळ आणि इंडिगोला नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये कारणे दाखवा असं सांगण्यात आले आहे.
काल इंडिगोच्या वैमानिकाला मारहाण
काल इंडिगोच्या एका वैमानिकाला प्रवाशाने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता, यात विमानाचे उड्डाण करण्यास उशीर झाल्याच्या रागातून त्या प्रवाशाने मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे. हे विमान दिल्लीतून गोव्यासाठी जात होते, पण धुक्यामुळे विमानाचे उड्डाण करण्यास उशीर झाला होता.