महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या महाविजयानंतर, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी महायुतीच्या विजयाचा फॉर्म्युला सांगितला आहे. महायुतीचा विजय दैवी शक्तीमुळे झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 आणि अजित दादा पवरा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत.
यासंदर्भात बोलताना अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, "आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला असा विजय मिळाला नाही, जो आता मिळाला आहे. मग लोकांना हे का समजले नाही? समजले नाही कारण दैवी शक्ती येथे काम करत होती. जेव्हा दैवी शक्ती कार्य करते तेव्हा मनुष्य त्याचे मूल्यमापन करू शकत नाही.
आम्हाला आभास होता, यामुळेच आपण बघितले असेल की, इतिहासात पहिल्यांदाच शंकराचार्य म्हणून आम्ही कोणाच्या तरी पक्षासाठी सांगितले की, जनतेने त्यांना मतदान करावे आणि आशीर्वाद द्यावा. आम्ही असे का म्हणालो? आम्ही आमची मर्यादा विसरत होतो का? विसरत नव्हतो. आम्ही दैवी शक्तीचा अनुभव करत होतो. हा आशीर्वाद एकनाथ शिंदे यांना मिळाला.
शंकराचार्य पुढे म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन असे काम केले, जे स्वातंत्र्यानंतरच्या 78 वर्षांच्या इतिसाहात कुणालाही शक्य झाले नाही. गायीला प्राण्यांच्या यादीतून काढून राज्य मातेचा दर्जा दिला. त्याच वेळी, या व्यक्तीला गो मातेचा आशीर्वाद मिळणार, असे आम्हाला वाटले. जसजशा निवडणुका जवळ आल्या, तसतसे आम्हाला हे ठामपणे वाटू लागले आणि गो मातेने आपला पुत्र एकनाथ शिंदे यांना असा आशीर्वाद दिला, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कामगिरीवर बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेचा प्रवाह कायम ठेवला आहे. यामुळेच जनतेने त्यांना 57 जागा दिल्या आहेत. अर्थात बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार आजही जिवंत आहे. मात्र, तिचे नेतृत्व आता त्यांचे पुत्र नव्हे तर शिष्य करत आहेत." उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या निवडणुकीत केवळ 20 जागाच मिळाल्या आहेत.