ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - पावसाळी वातावरणामुळे अनेक आजारांना आयतंच निमंत्रण मिळतं. शहरासह ग्रामीण भागात या दिवसांतून डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो. अनेक जण घरातील झाडाच्या कुंडीखाली किंवा आजूबाजूला साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच या गंभीर आजार पसरवणा-या डासांना आवतान मिळतं. मात्र आता डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी उत्तर दिल्ली पालिका नामी शक्कल लढवणार आहे. असं म्हणतात, एक खराब मासा पूर्ण तलाव घाणेरडा करू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का एका माशामुळेसुद्धा डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार पसरवणा-या डासांचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. गंबुजिया(गप्पी) माशांच्या मदतीनं हे शक्य होणार आहे. गंबुजिया (गप्पी) मासे फक्त डेंग्यू नव्हे, तर मलेरियाचा संसर्ग होण्यापासूनही लोकांना वाचवू शकतात. खरं तर गंबुजिया हे मासे जीवघेण्या डासांच्या अळ्या खातात. त्यामुळेच उत्तर दिल्ली पालिकेचा आरोग्य विभाग सार्वजनिक तलावांमध्ये हे मासे सोडण्याचा विचार करतोय. उत्तर दिल्लीत दिवसेंदिवस पसरणा-या डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या माशांचा वापर करण्याची तयारी उत्तर दिल्ली पालिकेच्या आरोग्य विभागानं सुरू केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमधून उत्पत्तीला सुरुवात होणा-या डासांवर आळा घालण्यासाठी तलावांमध्ये गंबुजिया मासे सोडण्याची योजना आखण्यात आली आहे. डेंग्यू आणि मलेरियाच्या अळ्या हे मासे जलदगतीनं खात असल्याचंही समोर आलं आहे.
आणखी वाचा(डेंग्यू आणि क्षयरोगाचा विळखा)(मलेरिया, डेंग्यूविषयी जनजागृती करणार)
उत्तर दिल्ली पालिकेचे अधिकारी डॉ. प्रमोद वर्मा यांच्या मते, डेंग्यूसारखा आजार विषाणूजन्य डासांमुळे पसरतो. डेंग्यू पसरवणा-या एडिस इजिप्ती जातीचा डास आणि मलेरिया पसवणारा एनाफलिज डासांचं उच्चाटन करण्यासाठी तलावांमध्ये गंबुजिया मासे सोडण्यात येणार आहेत. गंबुजिया मासे हे 24 तासांत 100 ते 300 अळ्या खाऊ शकतात. या माशांच्या वाढीसाठी 3 ते 6 महिन्यांचा कालावधी लागत असून, हा मासा महिन्याभरात 50 ते 200 अंडी घालतो. गंबुजिया या माशांचं आयुष्य 4 ते 5 वर्षांपर्यंत असतं. सध्या तरी दिल्लीतल्या काही तलावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे मासे सोडण्यात येणार आहे.