ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - भारतीय उद्योजकांनी शिकाऊ उमेदवारांना (अॅप्रेन्टिस) मोठ्या प्रमाणावर सामावून घ्यायला हवं, भलेही त्यांचा नफा थोडा घटला तरी चालेल असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. चीन व जपानमध्ये अॅप्रेन्टिसची संख्या कोटींमध्ये आहे, जर्मनीसारख्या देशात ३० लाख अॅप्रेन्टिस आहेत, परंतु भारतासारख्या सव्वा अब्ज लोकसंख्येच्या देशात केवळ ३ लाख अॅप्रेन्टिस असल्याचे सांगत ही परिस्थिती बदलायला हवी असे मोदी म्हणाले. दिल्लीत श्रमसंमेलनात बोलताना तरुणांना रोजगार हे मुख्य लक्ष्य असायला हवं आणि ही सुरुवात कुणीतरी करायला हवी असं सांगत उद्योगांनी सामाजिक जाणिवेच्या दृष्टीकोनातून अॅप्रेन्टिस नेमण्याला प्राधान्य द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
- १९६ कोटी रुपयांची तरतूद एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या आधुनिकीकरणासाठी करण्यात आली आहे.
- कामगारसंघटनांनीही कामगारांच्या हिताचा विचार करून सरकारला सहकार्य करावं.
- असंघटित क्षेत्रातल्या मजुरांचा विषय अत्यंत गंभीर आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करून हा प्रश्न सोडवायला हवा.
- कामगार कायद्यात सुधारणांच्या दिशेने भारत सरकार निश्चितपणे पावले टाकत आहे.
- नॅशनल करीअर सर्विस पोर्टल नरेंद्र मोदींच्या हस्ते लाँच करण्यात आलं.
- गरीबांसाठी आम्ही तीन योजना आणल्या आहेत, तुमच्या घरी काम करणा-या श्रमिकांना या योजनेचा फायदा करुन द्या.
- माझ्यावर सर्वात जास्त हक्क श्रमिक वर्गाचा.
- मी गरीबी बघितली आहे, म्हणूनच गरीबी जाणून घेण्यासाठी मला कॅमेरामन घेऊन जाण्याची गरज भासत नाही.
- कधी कधी आपण कामगारांच्या हिताची गोष्ट करतो, पण यातून कामगार हितापेक्षा कामगार संघटनेचे हित जास्त होते, या दोघांमधील फरक समजून घेण्याची गरज.
- सर्वांच्या सहमतीनेच आम्ही कामगार कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न करत आहोत.
- मालक व कामगारांमध्ये कुटुंबाची भावना निर्माण झाली तर विकासाच्या रथाला कोणीही थांबवू शकणार नाही.
कामगार व मालकामध्ये कुटुंबाची भावना निर्माण नाही तर व्यवसाय चांगला चालणार नाही.
- कामगार दुःखी असेल तर देश सुखी कसा होणार.