ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - उरी येथील लष्करी तळावरील पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानावर लष्करी कारवाई करण्याची मागणी होत आहे. पण भारताकडून तडकाफडकी अशी कोणतीही लष्करी कारवाई केली जाण्याची शक्यता कमी आहे.
सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मंत्र्यांना अशी तात्काळ धडक कारवाई न करण्याचा सल्ला मिळाल्याची माहिती आहे. भारताकडून प्रत्युत्तर म्हणून अशा लष्करी कारवाईची शक्यता लक्षात घेऊन नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी सैन्यही सर्तक झाले आहे. त्यामुळे तूर्तास लष्करी कारवाईचा पर्याय टाळण्याचा सल्ला दिला आहे.
आणखी वाचा
पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी दीर्घकालीन उपायांवर भर देण्याचा भारत सरकारचा विचार आहे. सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग सहभागी झाले होते. भविष्यात भारत पाकिस्तानी लष्कराच्या पायाभूत केंद्रांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. भारतीय लष्करानेही उरी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल. वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू असे स्पष्ट केले आहे.