आग्रा, दि. 8 - तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठा रेल्वे अपघात टळला. फारुखाबादच्या या तरुणाने प्रसंगावधान दाखवलं नसंत तर रेल्वे अपघात होऊन अनेक निष्पाल लोकांचा बळी गेला असता. रेल्वे रुळ तुटला असल्याचं लक्षात येताच तरुणाने आपल्या दिशेने येत असलेल्या रेल्वेकडे धाव घेतली आणि रोखण्याचा प्रयत्न केला. तरुणाने आपल्या अंगातील लाल शर्ट काढून एका काठीला बांधला आणि ट्रॅकवर उभा राहिला. सकाळी आठ वाजता कालिंदी एक्स्प्रेस कानपूर सेंट्रलच्या दिशेने जात होती. फारुखाबादपासून दोन किमी अंतरावर श्यामनगर येथे सुदैवाने ही दुर्घटना टळली.
ही दुर्घटना टाळत कौतुकास्पद कामगिरी करणा-या या तरुणाचं नाव पवन कुमार असं आहे. जोपर्यंत ट्रेनचा वेग कमी झाला नाही तोपर्यंत आपल्या हातातील लाल शर्ट तो फडकावत होता. ट्रॅक तुटला होता तेथून काही अंतरावर रेल्वे थांबल्याने मोठी दुर्घटना टळली.
पवन याने सांगितलं की, 'मी जवळच्या मंदिरात जात होतो, तेव्हा दोन मुलांनी येऊन मला ट्रॅक तुटला असल्याचं सांगितलं. त्यावेळी ट्रेन येणार होती. मी लगेच ट्रॅकच्या दिशेने धाव घेतली तेव्हा ट्रेन वेगाने येत असल्याचं पाहिलं. मी हात हलवत वेग कमी करण्याचा इशारा दिला पण मोटरमनने वेग कमी केला नाही. म्हणून मग नंतर मी माझा लाल शर्ट काढून हवेत फडकावला. यानंतर शेवटी ट्रेन थांबवण्यात आली'. यानंतर स्थानिक पोलीस आणि रेल्वे अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन रेल्वे ट्रॅकची पाहणी केली.
याचदिवशी दिल्लीमधील मिंटो ब्रीजजवळ रांची - राजधानी एक्स्प्रेस ट्रॅकवरुन उतरली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. याआधी काही तासांपुर्वी उत्तर प्रदेशात शक्तिपुंज एक्स्पेसचे सात डबे रुळावरुन घसरले होते. या दोन्ही दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचं रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितलं होतं.
फक्त एका महिन्यात चार दुर्घटनाफक्त एका महिन्यात चार रेल्वे अपघात झाले आहेत. गुरुवारी दोन रेल्वेंचा अपघात झाला होता. हे अपघात अशावेळी झाले आहेत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना सुरेश प्रभू यांच्या जागी पियूष गोयल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्रीपद दिलं आहे. पाच दिवसांत दोन रेल्वे अपघात झाल्यानंतर सुरेश प्रभू यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला होता.