ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केलं. 'मन की बात' चा हा 30 वा भाग होता. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मोदींनी बांगलादेशला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना त्यांनी श्रद्धांजली दिली. या तिघांना ब्रिटीश सरकार घाबरायचं. भगतसिंग सर्वांसाठी एक प्रेरणा आहेत त्यांच्या समाधीवर नक्की जावं असं पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं.
याशिवाय कॅशलेस इंडियात सहभागी होणाऱ्या देशवासीयांचे मोदींनी आभार मानले. सव्वाशे कोटी देशवासीयांमध्ये बदल व्हावा अशी इच्छा आहे, यातूनच न्यू इंडियाची पायाभरणी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भ्रष्टाचार आणि काळा पैशाविरोधातील लढाई सुरुच राहणार , सर्वांनी निर्धार केला आणि प्रयत्न केले तर न्यू इंडियाचे स्वप्न नक्की पूर्ण होईल असंही ते म्हणाले. तर, एक दिवस देशवासियांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर टाळावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
मन की बातमधून उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये मिळालेलं अभुतपूर्व यशाबाबत बोलण्याची सक्यता वर्तवली जात होती. यापूर्वी 29 व्या भागात मन की बातमध्ये पंतप्रधानांनी भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक केलं होतं. 15 फेब्रुवारी 2017 देशासाठी ऐतिहासिक दिवस होता, असं मोदी म्हणाले होते. या दिवशी जगासमोर वैज्ञानिकांनी भारताची मान गर्वाने उंच केली, असं ते म्हणाले होते.