रांची : नॅशनॅलिझम (राष्ट्रवाद) हा शब्द हिटलरच्या नाझीवादातून आला आहे. त्यामुळे या शब्दाचा वापर करण्याचे टाळा, असे आवाहन रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. त्यांनी मुखर्जी विद्यापीठामध्ये गुरुवारी हे वक्तव्य केले. याआधी भागवत यांनी इंग्लंडमध्ये असेच वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, नेशन (राष्ट्र), नॅशनल (राष्ट्रीय) व नॅशनॅलिटी (राष्ट्रीयत्व) म्हटले तर चालेल. पण नॅशनॅलिझम वापरू नका. त्याचा अर्थ आहे हिटलरचा नाझीवाद.
भागवत आज म्हणाले की, देशात मुलतत्त्ववादी विचारांमुळे असंतोषाचे वातावरण आहे. विविधता असून प्रत्येक जण हिंदू या शब्दामुळे परस्परांशी जोडला गेला आहे. कुणाचेही गुलाम व्हायचे नाही, कुणाला गुलाम करायचे नाही ही भारताची व भारतीयांची मनोभूमिका आहे.मोहन भागवत म्हणाले की, स्वत:च्या फायद्यासाठी संघ कधीही काम करत नाही. जागतिक पातळीवर भारत अग्रणी व्हावा यासाठी संघ झटत आहे. देश जशी प्रगती करेल, तसा संघ हिंदुत्वाचा अजेंडाही पुढे नेईल. हिंदुत्वामुळेच देशातील लोक एकमेकांशी जोडलेले राहातील. भारताला जागतिक महाशक्ती बनलेच पाहिजे.