आवाडे-आवळे संघर्ष निवडणूक फडात गाजणार
By admin | Published: February 06, 2017 2:51 PM
तानाजी घोरपडे
तानाजी घोरपडे हुपरी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी ,रेंदाळ व पणकोडोली या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावातील सत्तास्थाने ही माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या गटाकडे आहेत .मात्र मतदार संघाच्या पुनर्रचने मध्ये ही गावे हातकणंगले मतदार संघात समाविष्ट झाल्याने या तीनही मतदार संघाचा मालकी हक्क पर्यायाने माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या गटाकडे गेला आहे .गावोगावची प्रमुख सत्तास्थाने आवाडे गटाच्या ताब्यात व जिल्हा परिषद , पंचायत समितीचे उमेदवार मात्र आवळे गटाचे .अशा विचित्र परिस्थितीला कॉँग्रेस पक्षाच्या दोन्हीही गटातील कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागत आहे .परिणामी आवाडे -आवळे यांच्यातील जगजाहीर असणारा छुपा संघर्ष यापुढे आत्ता निवडणुकीतील फडामध्ये चांगलाच गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत . कॉँग्रेस पक्षाच्या जिल्हा व राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांना या तीनही मतदार संघाची राजकीय परिस्थिती पूर्णपणे माहीती आहे .तरीही आवाडे -आवळे वादावर सवर्मान्य तोडगा काढावयाचा सोडून तसेच या वादातून पक्षाचे होणारे नुकसान समोर दिसत असून देखील केवळ व्यक्ति द्वेशातून पक्षातील आवाडे यांचे अस्तित्वच संपुष्टात आणण्याचा कांही नेत्यांचा प्रयत्न सुरु असल्याचे चित्र समोर येत आहे . परिणामी गटाच्या अस्तित्वासाठी व कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाडे पिता -पुत्रांनी आत्ता पक्षनिष्ठा कांही काळापुरती बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . कोल्हापूर जिल्हा ताराराणि विकास आघाडी च्या माध्यमातून हुपरी ,रेंदाळ व पणकोडोली मतदार संघातील निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरण्याचा निर्धार आवाडे गटाने केला आहे . माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी सन 1978 मध्ये पहिली विधान सभा निवडणुक लढविली तेव्हांपासून आजपर्यंत म्हणजे जवळ-जवळ 48 वर्षे ते व त्यांचे कुटुंब हुपरी परिसरातील 13 गावाशी अगदी तन -मनाने एकरूप होवून ग्रामीण जनतेच्या सुख -दुखात त्यांचा नेहमीच सहभाग राहिला आहे .या सर्वच गावातील सर्वांगीण विकास ,सधनता ,आर्थिक क्रांती तसेच कला ,क्रीडा ,सामाजिक व शैक्षणिक विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे हे कुणीही नाकारू शकत नाही . इचलकरंजी विधानसभा मतदार संघात जो पर्यंत हुपरी सह परिसरातील 13 गावांचा समावेश होता तो पर्यंत त्यांच्या राजकीय अस्तित्वाला एखादा अपवाद सोडला तर धक्का लागण्याची वेळ कधिही आली नाही. परंतु दुर्दैवाने आठ वर्षा पूर्वी मतदार संघाची पुनर्रचना झाली अन आवाडे कुटुंबाचे राजकीय दिवस बदलले गेले .गेल्या कांही दिवसापासून लोकसभा ,विधानसभा ,नगरपालिका आदी निवडणुकीत पराभवाची मालिकाच सुरू झाली आहे .आवाडे कुटुंब व ग्रामिण भाग यांचे मतदार संघ पुनर्रचनेमुळे राजकीय संबंध जरी दूरावले गेले असले तरी ग्रामिण जनतेने मात्र त्यांच्याशी अजूनही पूर्वीसारखेच ऋणानुबंध जपून ठेवल्याची अनेक उदाहरणे आहेत .हुपरी परिसरातील तेराही गावातील ग्रामपंचायतीं ,विकास सेवा संस्था ,दूध संस्था ,पत संस्था ,पाणीपुरवठा संस्था ,शैक्षणिक संस्था ,जवाहर साखर कारखाना आदी संस्था मध्ये आवाडे पिता -पुत्रांना मानणारे त्याना आदर ,मान -सन्मान देवून त्यांचेच नेत्रुत्व मानणारे अनेक कार्यकर्ते आजही गावोगावी कार्यरत आहेत .या सर्वच गावावरती आवाडे यांची चांगलीच हुकुमत आहे .या भागातून गत वेळी निवडून गेलेले जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य हे सुद्धा त्यांचेच नेत्रुत्व मानतात .अशा प्रकारची सत्य परिस्थिती कॉँग्रेस पक्षाच्या नेत्याना पहावयास मिळत असतानाही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या उमेदवारी वाटपात आवाडे पिता -पुत्रांना डावलुन त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यावर कॉँग्रेस पक्षा कडून अन्याय करण्यात येत आहे .तसेच आवाडे यांना गटाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी व गटाच्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे .अशी भावना आवाडे गटाच्या हुपरी परिसरातील कार्यकर्त्यांची झाली आहे . ---------::---------फोटो -- माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे .