अठराव्या लोकसभेमधील सदस्यांच्या आसन व्यवस्थेला अंतिम रूप देण्यात आलं आहे. मात्र या आसन व्यवस्थेवरून इंडिया आघाडीमधील घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं दिसत आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी नव्या बैठक व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विशेषकरून अयोध्येतील खासदार अवधेश प्रसाद यांना मागच्या बाकांवर पाठवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून अवधेश प्रसाद हे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत पहिल्या रांगेत बसत असत. मात्र नव्या बैठक व्यवस्थेमध्ये अवधेश प्रसाद यांना दुसऱ्या रांगेतील आसन देण्यात आले आहे. मात्र आसन व्यवस्थेत केलेल्या बदलाची माहिती काँग्रेसने अखिलेश यादव यांना देण्यात आली नव्हती. बैठक व्यवस्थेत बदल करताना काँग्रेसने विश्वासात घेतले नाही, तसेच त्याची आधी माहितीही दिली नाही, असा आक्षेप अखिलेश यादव यांनी घेतला आहे.
इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस हा मुख्य विरोधी पक्ष आहे. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षांच्या बाकांवरील आसन व्यवस्थेचं मित्रपक्षांमध्ये वाटप करण्याची जबाबदारी काँग्रेसवर होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने पुढच्या रांगेत बसणाऱ्या समाजवादी पक्षाच्या सदस्यांची संख्या दोन वरून घटवून १ केली आहे. त्यामुळे केवळ अखिलेश यादव यांनाच पुढे बसता येणार आहे. हा प्रश्न सरकारसमोर उपस्थित न केल्याने अखिलेश यादव हे काँग्रेसवर नाराज आहेत.