नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. त्यानंतर लोकसभेतही कलम 370 वर वादळी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 351 विरुद्ध 72 मताधिक्याने पारित झाले. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय झाला. या निर्णयाचे देशभरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होऊ लागले. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतनेही मोदी-शहा यांना कृष्ण-अर्जुन संबोधून या दोनही नेत्यांचे कौतुक केले होते.
काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर अनेक स्तरावरुन मोदी-शहा जोडीचे कौतुक होत असतानाच दाक्षिणात्य कलाकार रजनीकांतनेदेखील मोदी सरकारचे कौतुक केले आहे. त्यांनी चेन्नईमध्ये राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. रजनीकांत यांच्या या वक्तव्यावरुन एआयएमआयएमचे खासदार असुदुद्दीन औवेसीं यांनी रजनीकांतला प्रश्न विचारला आहे. जर मोदी-शहा कृष्ण अजुर्न असतील तर या परिस्थितीत कोण पांडव आणि कोण कौरव ? असा प्रश्न औवेसींनी विचारल आहे. तसेच तुम्हाला, देशात आणखी एकदा महाभारत घडवायचंय का? असा प्रश्नही औवेसींनी रजनीकांत यांना विचारला आहे.
दरम्यान, रजनीकांतने मोदी-शहांचे कौतुक करता म्हटले की, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोडी म्हणजे कृष्ण आणि अर्जुनाची जोडी आहे. तसेच, अमित शहांनी मिशन काश्मीर पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा, असेही रजनीकांत म्हणाले.