श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरामध्ये पोलिसांसह 42-आरआर आणि सीआरपीएफ-130 बटालयिनच्या तुकडीने केलेल्या संयुक्त कारवाईत आज जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आलं आहे. अवंतीपोरा व त्राल भागातील दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.
अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेला संवेदनशील माहिती देखील पुरवत होते. काही दिवसांपूर्वी जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा जवानांच्या मोहिमेला यश आलं होतं. काश्मीरच्या अवंतीपोरा परिसरात शोध मोहिमेदरम्यान, एकाला अटक करण्यात आली होती. अमीर आश्रफ खान असं अटकेतील तरुणाचं नाव असून त्याच्याकडून चायनीज हँड ग्रॅनेड जप्त करण्यात आले. घराच्या कंपाऊंडमध्ये एका प्लास्टीक बाटलीत या युवकाने हे हँड ग्रॅनेड लपवले होते. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याची चौकशी करण्यात आली.
अवंतीपोरा येथे गुरुवारी सुरक्षा जवानांनी केलेल्या कारवाईत 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. अल-बदल संघटनेच्या 4 दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणा स्फोटक आणि शस्त्रास्त्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. एके 46 रायफल, एके 56 मॅगजीन, 28 राऊंड गोळ्या, स्फोटक आणि हँड ग्रॅनेड जप्त करण्यात आलंय. यावेळी, दहशतवादी आणि सुरक्षा दलांतील जवानांमध्ये चकमकही झाली होती. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातही सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाली होती.
26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लख्वीला 15 वर्षांची शिक्षा
लश्कर ए तोयबाचा कमांडर आणि 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लख्वीला (61) टेरर फंडिंगप्रकरणी पाकिस्तानातील न्यायालयाने 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. टेरर फंडिंगसंबंधीत एका प्रकरणात लख्वीला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने शुक्रवारी म्हणजेच आज लख्वीला ही शिक्षा ठोठावली आहे. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा लख्वी हा मास्टरमाइंड आहे. लाहोरमध्ये लख्वीविरोधात टेरर फंडिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो डिस्पेंसरीच्या नावाखाली पैसे गोळा करत होता आणि त्या पैशांचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हा पैसा वापरण्यात येत होता.