नवी दिल्ली : बीओसीचे प्रधान महासंचालक सत्येंद्र प्रकाश यांना आज वर्ष २०२१-२२ साठी मतदार जागरूकतेच्या दिशेने केलेल्या सक्रिय प्रयत्नांसाठी राष्ट्रीय पुरस्काराने येथे सन्मानित केल गेले. हा पुरस्कार निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दिला जातो. राष्ट्रीय मतदार दिन २०२२ निमित्त आयोगाकडून सत्येंद्र प्रकाश यांना प्रमुख पाहुणे केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू, मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला गेला. कोविड-१९ च्या सध्याच्या आव्हानात्मक दिवसांत मतदानात जनतेचा सहभाग वाढावा, यासाठी त्यांना शिक्षित करून त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यात सत्येंद्र प्रकाश यांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान केला गेला आहे.
कोविड-१९ मुळे लोकांशी थेट संवाद एक आव्हान बनले आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवे मार्ग शोधून संवाद प्रभावी करण्यात सत्येंद्र प्रकाश यांचे योगदान खूप महत्त्वाचे ठरले आहे. उल्लेखनीय आहे की, अशाप्रकारच्या प्रयत्नांनी मतदारांच्या सहभागाची टक्केवारी वाढली आहे.प्रकाश यांच्या नेतृत्वात बीओसी आपल्या २३ क्षेत्रीय आऊटरीच ब्यूरो (आरओबी) आणि १४८ फिल्ड आऊटरीच ब्यूरोसह (एफओबी) नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहे. व्हाॅट्स-ॲप ग्रुप्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर ट्वीट्स/री-ट्वीट्स, एसएमएस, टेलिफोनिक कॉल्स आणि वेबिनारच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याचे काम केले जात आहे. या सोशल मीडिया माध्यमांचा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे साधन म्हणून वापर केला जात आहे. सत्येंद्र प्रकाश यांना यापूर्वी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार २०१८ मध्ये सर्वश्रेष्ठ वृत्तचित्र फिल्म निर्माता म्हणून ‘रजत कलम’ने सन्मानित केले गेले होते.