नवी दिल्ली : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला आणि विशेषत: कर्णधार विराट कोहलीला टार्गेट करून दहशतवादी हल्ला होण्याची भीती आहे. अज्ञात व्यक्तीने लिहिलेले हल्ल्याच्या धमकीचे पत्र एनआयएच्या हाती लागले असून त्यानंतर या राष्ट्रीय तपास संस्थेने दिल्ली पोलिसांना सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या पत्रानुसार कोळीकोड येथील ऑल इंडिया लष्कर भारतीय कर्णधार विराट कोहलीसह अरुण जेटली स्टेडियममध्ये उपस्थित राहणाऱ्या राजकीय व्यक्तींना लक्ष्य करु शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएला मिळालेल्या पत्रानुसार दहशतवाद्यांचा हिटलिस्टमध्ये विराट कोहलीचे नाव आहे. याशिवाय या पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी, भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांचेही नाव आहे. या टी२० मालिकेसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली असून भारतीय संघाचे नेतृत्त्व रोहित शर्मा करणार आहे.