ऑनलाइन लोकमतबिलासपूर, दि. 11 - चित्रपटात ताजमहाल, विहिर चोरीला गेल्याचे तुम्ही पाहिलं असेल. पण छत्तीसगडमधील दोन महिलांनी आपले शौचालय चोरी गेल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. छत्तीसगड राज्यातील बिलासपूरमधील अमरपूर गावात ही अजब गजब घटना घडली आहे. येथील दोन महिलांनी आपल्या घरासमोरुन चक्क शौचालय चोरी गेल्याची अनोखी तक्रार त्यांनी दाखल केली आहे. शौचालय शोधण्याचा आणि त्या चोराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्या महिलांनी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरपूर गावातील बेला बाई(70) आणि त्यांची मुलगी चंदा बाई(45) यांनी 2015-16 मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी अर्ज केला होता. बेला आणि चंदा ह्या गरीब (पिवळ्या कार्ड धारक) असून त्या दोघी विधवा आहेत. आई आणि मुलगी एकाच घरात राहतात. ग्रामपंचायतीने गावातील शौचालयाच्या अन्य अर्जासह त्यांचाही अर्ज जनपत पंचायत समितीकडे पाठवले. जनपत पंचायतीने त्यांच्या शौचालय निर्मतीला परवाणगी देत ग्राम पंचायतकडे प्रकरण दिले होते. शौचालय निर्मीतीचा अर्ज दाखल करुन एक वर्ष उलटले तरी त्याबाबत ग्रामपंचायतीकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दोघींनी थेट जनपत पंचायतीचा दरवाजा ठोठावला. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, चंदा आणि बेला जनपत पंचायतीच्या फेऱ्या मारत होत्या त्यावेळी अमरपूर गावातील माहिती अधिकार कार्यकर्ता सुरेंद्र पटेल यांनी या प्रकरणाची माहिती मागवली. त्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, बेला आणि चंदा यांच्या नावे शौचलयाचे नोंदी झाल्या असून त्यांनी त्याचे पैसेही देण्यात आले आहेत.
हे सर्व प्रकरण त्या दोघींना समजले त्यावेळी त्यांनी थेठ पोलीस स्थानकात धाव घेत आपली तक्रार दाखल केली. बेला आणि चंदा यांच्या तक्रारीनंतर पोलीस या घटनेचा तपास घेत आहेत. यामध्ये कोण दोषी आहे याचा छडा ते लवकरच लावतील असा विश्वास माहिती अधिकार कार्यकर्ता सुरेंद्र पटेल यांनी व्यक्त केला.