ऑनलाइन लोकमत -
कानपूर, दि. 07 - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आल्यापासून अर्थव्यवस्था सुधारली की खालावली हा चर्चेचा विषय असू शकतो. पण या चर्चेतून झालेल्या वादामुळे एका दांपत्याने ठरलेलं लग्न मोडल्याची अजब घटना कानपूरमध्ये घडली आहे.
व्यवसायिक असलेला मुलगा आणि सरकारी नोकरी करणारी मुलगी या दोघांचं लग्न ठरलं होतं. लग्नातील खर्चावर चर्चा करण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी भेटण्याचं ठरवलं होतं. मंदिरात सुरु असलेली ही चर्चा व्यवस्थित सुरु होती. पण भारतीय अर्थव्यवस्था हा विषय चर्चेत आला आणि सगळं फिस्कटलं.
सरकारी कर्मचारी असणा-या मुलीने भारतीय अर्थव्यवस्था खालावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचं मत व्यक्त केलं. पण मोदी समर्थक असलेल्या मुलाला हे पटलं नाही, ज्यामुळे दोघांमध्ये जोराचं भांडण सुरु झालं. हे भांडण इतकं मोठं झालं की दोघांनीही ठरलेलं लग्न मोडण्याचं निर्णय घेतला आणि आपल्या मार्गाने निघून गेले. आपण लग्न करणार नसल्याचं दोघांनीही आपापल्या कुटुंबियांना कळवलं आणि लग्न मोडून टाकलं.