ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - सीबीएसई शाळांमध्ये शारिरीक शिक्षणाच्या पुस्तकातून विद्यार्थ्यांना महिलांच्या फिगरबद्दल शिकवलं जात असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिलं जात असून ज्या मुलींचा फिगर 36-24-36 असतो त्या सर्वोत्तम असतात असं सांगितलं जात आहे. या पुस्तकात पुरुष आणि महिलांच्या फिटनेससंबंधी सांगण्यात आलं आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पुस्तकात एक प्रश्न आहे की, कोणत्या आकार म्हणजेच शेपमधील महिला सर्वोत्तम असतात ? या प्रश्नाचं उत्तर देत सर्व फिगरच्या महिलांचा उल्लेख करण्यात आला आहे. आणि सांगण्यात आलं आहे की, ज्या महिलांचा फिगर 36-24-36 असतो त्या सर्वोत्तम असतात. इतकंच नाही तर हा मुद्दा पटावा यासाठी मिस वर्ल्ड तसंच मिस युनिव्हर्स सारख्या स्पर्धेत भाग घेणा-या मॉडेल्सचं उदाहरणही देण्यात आलं आहे. जर अशी फिगर हवी असेल तर व्यायाम करा असा सल्लाही देण्यात आला आहे.
सीबीएसईने झटकले हात -
बुधवारी सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच गाजलं. अनेकांनी अशा गोष्टी आमच्या मुलांना सांगून नेमकं काय शिकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं विचारलं. तर दुसरीकडे सीबीएसईने आपले हात झटकत, "हे पुस्तक आमचं नसून एका खासगी प्रकाशकाचं आहे. आम्ही आमच्याशी संबंधित शाळांना कोणत्याही खासगी प्रकाशकाचं पुस्तक शिकवण्यास सांगत नाही".
सीबीएसई जरी नकार देत असलं तरी हे वादग्रस्त पुस्तक सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये शिकवलं जात आहे. न्यू सरस्वती पब्लिकेशनच्या या पुस्तकाचं नाव ‘हेल्थ अँण्ड फिजिकल एज्यूकेशन’ असं आहे. डॉ व्ही के शर्मा या पुस्तकाचे लेखक आहेत.