नवी दिल्ली - अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या मंदिर (Ram Mandir) बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी या मोहिमेला प्रतिसाद देत देणग्या दिल्या आहेत. राम निर्माणासाठी दान जमा करण्याचं अभियान शनिवारी पूर्ण झालं आहे. जानेवारीमध्ये सुरू झालेल्या या अभियानात आतापर्यंत जवळपास 2100 कोटी रुपये दान जमा झालं आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपर्यंत 2100 कोटी रुपये जमा झाले आहेत.
गेल्या 44 दिवसांत ही देणगी जमा झाली आहे. गिरी यांनी "परदेशात राहणारे रामभक्तही इतर देशांमध्येही अशीच मोहीम सुरू करावी अशी मागणी करत आहेत. अशा लोकांकडून देणगी कशी गोळा करावी याबाबत पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल. श्री राम यांचा जन्म अयोध्येत झाला होता, मंदिर बांधले गेले होते, हा मुद्दा देशाच्या स्वातंत्र्याच्या काळापासून प्रलंबित होता. त्याचे बांधकाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केले" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी परिसरात सुरू असलेलं खोदकाम जवळपास 16 फूटांपर्यंत झालं आहे. ज्या लेवलवर 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा केली होती, त्या लेवलपासून 5 मीटर खाली जमिनीचं खोदकाम झालं आहे.
अशोक सिंघल यांच्या काळात आर्किटेक्ट चंद्रकांत सोनपुरासह 1992 मध्ये एक करार झाला होता, त्यात काही मुद्दे वाढवण्यात आले आहेत. दुसरा करार 70 एकरात मंदिराचा भाग सोडून बाकी उरलेल्या भागाचा विकास करणं आहे. हा भाग विकसित करण्यासाठी टाटा कंसल्टेंसीसह करार झाला आहे. तिसरा करार उरलेल्या भागावर कुठे बिल्डिंग उभारली जाईल, त्याचं वास्तू शास्त्र काय असेल, त्याचं मानचित्र, डिटेलिंग कसं असेल हा करार आहे. हा करार नोएडातील फार्म डिझाइन असोसिएटसह झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यानंतर, मंदिराच्या कामाला गती मिळाली आहे. राम मंदिर उभारणीसाठी रामनाथ कोविंद यांनी आपल्यातर्फे आणि आपल्या कुटुंबीयाच्या वतीने पाच लाख, 100 रुपयांची देणगी दिली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांनी पाच लाख, 11 हजार रुपयांची देणगी दिली. अनेक राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनीही देणग्या दिल्याची माहिती मिळाली आहे. अगदी सामान्य माणसांपासून, व्यापारी, उद्योजकांपर्यंत सर्वजण या मोहिमेत सहभागी होत राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत.
राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने पटकावला प्रथम क्रमांक
राजपथावर निघालेल्या परेडमध्ये यंदा उत्तर प्रदेशकडूनराम मंदिराची प्रतिकृती उभारत चित्ररथ सादर करण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणून यंदा उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. राम मंदिराची प्रतिकृती असलेला चित्ररथ राजपथावरून मार्गस्थ झाला तेव्हा प्रेक्षकांकडूनही त्याचं टाळ्या वाजवून भरभरून कौतुक करण्यात आलं. तर काही जणांनी या मंदिरालाच हात जोडून नमस्कार केला. उत्तर प्रदेशचे माहिती संचालक शिशिर यांनी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती दिली होती. "यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिवसाला उत्तर प्रदेशच्या भव्य चित्ररथाचा प्रथम स्थान देऊन गौरव करण्यात आला आहे. सर्व टीमला मनापासून शुभेच्छा. गीतकार विरेंद्र सिंह यांचे विशेष आभार" असं शिशिर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.