लखनऊ : सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात अयोध्येतील राम मंदिर बाबत निकाल जाहीर केला. यामुळे राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साऱ्या देशाने हा निकाल सकारात्मक दृष्टीने स्वीकारला आहे. याच बरोबर एका मोठ्या समाजाचा तब्बल 500 वर्षांपूर्वीचा संकल्प पूर्ण झाला आहे.
अयोध्येच्या बाजुलाच असलेल्या पूरा बाजार ब्लॉक आणि आसपासच्या 105 गावांतील सूर्यवंशी क्षत्रिय समाज तब्बल 500 वर्षांनी पगडी बांधणार आहे. तसेच पायात चामड्याची चप्पल घालणार आहे. कारण राम मंदिराच्या निर्मितीचा संकल्प पूर्ण होणार आहे. या गावांतील क्षत्रिय समाजाच्या नागरिकांना पगड्या वाटल्या जात आहेत. सूर्यवंशी समाजाच्या पूर्वजांनी जेव्हा मंदिरावर हल्ला झाला होता तेव्हा शपथ घेतली होती. जोपर्यंत मंदिर पुन्हा बांधले जात नाही तोपर्यंत डोक्यावर पगडी आणि पायात चप्पल घालणार नाही. याचबरोबर छत्रीने डोके झाकणार नाही.
सूर्यवंशी क्षत्रिय परिवार अयोध्या जिल्ह्याच्या 105 गावांमध्ये राहतात. हे सर्व ठाकूर परिवार भगवान रामाचे वंशज असल्याचे मानतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या गावांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. सराय़रासीच्या न्यायालयात वकील असलेल्या बासदेव सिंह यांनी सांगितले की न्य़ायालयात आतापर्यंत 400 पगड्यांचे वाटप करण्यात आले आहे. या समाजाचे जवळपास दीड लाख लोक आहेत. त्यांनी गेली अनेक पिढ्या पगडी बांधलेली नाही.
लग्नावेळीही डोके उघडे ठेवून कापड गुंडाळले जात होते. त्यांच्या पूर्वजांनी चप्पल सोडण्याचा संकल्प केलेला तेव्हा चामड्याची पादत्राने मिळत होती. यामुळे या लोकांनी कधीच चामड्याचे चप्पल घातले नाही. आता या भागात चामड्याच्या चप्पलाची मागणी वाढली आहे.