अयोध्या: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न होत आहे. यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या भव्यदिव्य राममंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल. अयोध्या आणि राम मंदिरावरून देशात प्रचंड राजकारण झालं. भाजपानं १९८९ मध्ये राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला. मात्र काँग्रेसनं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी झालेल्या अयोध्येतल्या पोटनिवडणुकीत रामाच्या नावावर मतं मागितली होती. इतकंच नव्हे, तर त्यांना हिंदुत्वाचं कार्डदेखील अगदी स्पष्टपणे वापरलं होतं.देशाच्या स्वातंत्र्यासाठी १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. १९३४ मध्ये काँग्रेसमध्ये राम मनोहर लोहिया आणि आचार्य नरेंद्रदेव यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांचा एक गट तयार झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवसांतच आचार्य नरेंद्रदेव यांनी त्यांच्या ७ समर्थक आमदारांसह उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मार्च १९४८ मध्ये त्यांनी सोशालिस्ट पक्षाची स्थापना केली.आचार्य नरेंद्रदेव यांनी अयोध्येला (फैजाबाद) त्यांची राजकीय कर्मभूमी बनवलं होतं. आचार्य यांनी सोशालिस्ट पक्षाकडून फैजाबाद विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. त्यावेळी गोविंद वल्लभ पंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांनी नरेंद्रदेव यांच्या विरोधात हिंदू संत बाबा राघव दास यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली. राघव दास स्वत:ला गांधीवादी आणि विनोबांचे शिष्य म्हणायचे. मात्र फैजाबादमधील पोटनिवडणुकीत काँग्रेसनं त्यांना हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून उमेदवारी दिली.मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत फैजाबादमध्ये बाबा राघव दास यांच्या प्रचाराला आले होते. आचार्य नरेंद्र देव प्रभू रामचंद्रांना मानत नाहीत. ते नास्तिक आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची नगरी अशा व्यक्तीला कशी स्वीकारेल?, असा सवाल पंत यांनी प्रचारावेळी उपस्थित केला होता. फैजाबाद पोटनिवडणुकीत काँग्रेसनं हिंदुत्व कार्ड वापरलं. २८ जून १९४८ मध्ये मतदान झालं. त्यात राघवदास यांना ५ हजार ३९२ मतं मिळाली. तर आचार्य नरेंद्रदेव यांना ४ हजार ८० मतं मिळाली. त्यामुळे मुख्यमंत्री पंत यांची धार्मिक खेळी यशस्वी ठरली. आचार्य नरेंद्रदेव १ हजार ३१२ मतांनी पराभूत झाले. रामाच्या नावाचा वापर झालेली ही देशातली पहिली निवडणूक होती.
स्वातंत्र्यानंतरच्या एका वर्षातच काँग्रेसनं वापरलं रामनामाचं कार्ड; 'असा' होता निवडणुकीचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 12:45 PM