नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचन सुरू आहे. शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बाबरी मशिदीवर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. बाबरी मशीद रिकाम्या जागेवर बांधली गेली नव्हती, असं न्यायालयानं म्हटलं आहे. खोदकामानंतर पुरातत्व विभागानं केलेल्या दाव्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालय याकडे पुरावे म्हणून पाहतं. खोदकामानंतर सापडलेल्या कलाकृती या इस्लामिक नव्हत्या, असं देखील सर्वोच्च न्यायालयानं निकालाच्या वाचनादरम्यान स्पष्ट केलं आहे. निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. निकालामुळे पोलिसांचा तसेच सशस्त्र दलांचा कडक बंदोबस्त आहे. सोशल मीडियावरून विविध अफवा वा प्रक्षोभक संदेश एकमेकांना पाठवले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन सोशल मीडियावर पोलीस लक्ष ठेवून आहेत.
व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. तसेच कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. याबाबत ग्रुप अॅडमिननेही कुठल्याही अफवांना खतपाणी घालू नये, असेही पोलिसांकडून नमूद करण्यात आले आहे. अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. अफावा पसरू नये यासाठी अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करत संशयित व्यक्ती, वस्तू, वाहने आणि सामानाची तपासणी सुरू आहे.
नागरिकांनीही न्यायालयाचा आदेश मान्य करून, शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदरचा निकाल काहीही असो या निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया व्हॉट्सअॅप, फेसबुक अथवा इतर सोशल मीडियावर देणे, पत्रकबाजी टीकाटिप्पणी देणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल. अशा व्यक्तींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी नमूद केले आहे. निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला केवळ जागेसंदर्भातील निकाल असेल. पोलिसांकडून देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकवल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार कारवाई होऊ शकते, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.
जमाव करून थांबू नये, निकालानंतर गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नयेत, सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत, महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये, निकालानिमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नये, घोषणाबाजी, भाषणबाजी जल्लोष करू नये, मिरवणुका, रॅली काढू नये, कोणतेही वाद्य वाजवू नये, धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारू नये, कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडीओ, फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये, अशा सूचनाही सुरक्षेच्या तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी दिल्या आहेत.