नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात आध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांनी मध्यस्थी करण्याच्या दाखवलेल्या तयारीबद्दल भाजपचे माजी खासदार राम विलास वेदांती यांनी गुरुवारी प्रश्न उपस्थित केला. रविशंकर यांनी गोळा केलेल्या अमाप संपत्तीची चौकशी होऊ नये यासाठीच त्यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप वेदांती यांनी केला.अयोध्येतील वादाशी संबंधित असलेल्या पक्षांची अयोध्येत गुरुवारी भेट घेण्याचे रविशंकर यांनी ठरवले असतानाच वेदांती यांनी वरील भाष्य केले. वेदांती म्हणाले की, वादात मध्यस्थी करणारे रविशंकर कोण आहेत? त्यांनी त्यांची स्वयंसेवी संस्था चालवावी व विदेशी निधी ढिगाने गोळा करावा. त्यांनी प्रचंड संपत्ती गोळा केली असून, तिची चौकशी टाळण्यासाठीच त्यांनी राम मंदिर प्रश्नात उडी घेतली आहे.मला ऐक्य हवे आहे, मला सलोखा हवा आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. आम्ही सगळ्यांशी बोलू, असे रविशंकर यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल बुधवारी म्हटले होते.रविशंकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बुधवारी सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना रविशंकर म्हणाले की, या वादात सरकार पक्षकार नसल्यामुळे मी संबंधित बाजूंना आधीच सांगितले आहे की संवादाच्या माध्यमातून तुम्ही अंतिम निर्णय घेऊन येणार असाल तर त्याला पाठिंबा द्यायला सरकार पूणपणे बांधील आहे.जर ते निर्णयापर्यंत येऊ शकत नसतील तर प्रकरण न्यायालयात आहेच आणि तेथे जो निर्णय होईल तो सरकार पालन करील.विहिंपनेही केला आहे विरोध...वेदांती हे राम मंदिर चळवळीशी संबंधित असून, यापूर्वीही रविशंकर यांनी मध्यस्थीची दाखवलेली तयारी त्यांनी फेटाळून लावली होती. रविशंकर यांनी मध्यस्थीच्या दाखवलेल्या तयारीला आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि विश्व हिंदू परिषदेनेही विरोध केलेला आहे.
अयोध्या प्रकरण :मध्यस्थी करणारे रविशंकर कोण ? भाजपचे माजी खासदार वेदांती यांचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:22 AM