नवी दिल्ली - गेल्या तीन दशकांत देशातील राजकीय आणि सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव पाडणाऱ्या अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुानवणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी खटल्याच्या सुनावणीसाठी कालमर्यादा निश्चित केली असून, सर्व पक्षकारांना 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यामध्ये अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा अंतिम निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अयोध्येतील वादग्रस्त जागेप्रकरणी मध्यस्थीच्या प्रयत्नांसाठी सुनावणी थांबवण्यात येणार नाही. न्यायालयातील सुनावणीबरोबरच मध्यस्थीचे प्रयत्न सुरू ठेवता येतील, असे सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीदरम्यान सांगितले. तसेच सर्व पक्षकारांना 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करावेत, अशी सूचनाही सरन्यायाधीशांनी या खटल्यातील सर्व पक्षकारांना केली.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीपूर्वी अयोध्या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अत्यंत संवेदनशील असलेल्या या खटल्याच्या सुनावणीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून दररोज एक तास अधिक सुनावणी घेण्याचा तसेच शनिवारीदेखील सुनावणी घेण्याचा सल्ला सरन्यायाधीशांनी दिला आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, ''राम मंदिर जन्मभूमी खटल्यातील सर्व पक्षकारांचे युक्तिवाद आणि दावे 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाले पाहिजेत. जेणेकरून निकाल लिहिण्यासाठी पुरेसा अवधी मिळू शकेल.'' त्यावर उत्तर देताना मुस्लिम पक्षकारांनी आपला युक्तिवाद 27 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर हिंदू पक्षकारांनी उलट तपासणीसाठी दोन दिवस लागतील असे सांगितले. तर मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी आपल्यालाही उलट तपासणीसाठी दोन दिवस लागतील, असे सांगितले. ''या खटल्यात मध्यस्थीसाठी आम्हाला पत्र मिळाले आहे. आता हे प्रयत्न नियमित सुनावणीपासून स्वतंत्रपणे समांतर पातळीवर सुरू ठेवता येतील, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.