रामजन्मभूमी परिसरातील मंदिरात विराजमान असलेल्या प्रभू श्रीरामाच्या आरतीत सहभागी होण्यासाठी भक्तांनाही परवानगी देण्यात आली आहे. सायंकाळी होणाऱ्या आरतीत सहभागी होणाऱ्या भक्तांना आता रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पास देण्यात येणार आहे. सध्या ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान आहे त्या ठिकाणी मर्यादित जागा उपलब्ध आहे. म्हणूनच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आरतीसाठी दररोज ३० भक्तांना सहभागी होता येणार आहे. अयोध्येच्या इतिहासात पहिल्यांदाच भक्तांना आरतीत सहभागी होता येणार आहे.आरतीत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे पासेस देण्यात येणार आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोज ३० भक्तांना पासेस देण्यात येतील. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या तत्त्वावर हे पासेस दिले जातील. प्रभू श्रीरामाच्या आरतीसाठी भाविकांना संध्याकाळी ६ वाजता रामजन्मभूमीचं प्रवेशद्वार रंगमहल बॅरिअरकडे पोहोचावं लागेल. त्यानंतर प्रशासनाच्या नियमांनुसार त्यांना आरतीसाठी पासेस देण्यात येतील. तसंच या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यासही मनाई असेल. याव्यतिरिक्त कॅमेरा आणि मोबाईल फोनही नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसंच पासेससाठी भाविकांकडून कोणत्याही प्रकारचं शुक्ल आकारलं जाणार नाही. रामजन्मभूमी येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्व त्या उपययोजना करण्यात आल्या आहेत. तसंच भाविकांच्या सोयीसाठीही छत्र उभारणं, पिण्याचं पाणी अशा सोयींचीदेखील काळजी घेण्यात आली आहे. संतांच्या आवाहनानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं प्रभू श्रीरामाच्या आरतीत आता भाविकांनाही सहभागी होण्याची संधी दिली आहे.
अयोध्या : पहिल्यांदाच रामलल्लाच्या आरतीत भक्तांना सहभागी होण्याची परवानगी
By जयदीप दाभोळकर | Published: January 05, 2021 2:39 PM
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून भक्तांसाठी जारी करण्यात येणार पास, इतिहासात पहिल्यांदाच भक्तांना आरतीत सहभागी होता येणार
ठळक मुद्देइतिहासात पहिल्यांदाच भक्तांना आरतीत सहभागी होता येणारकोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसाला ३० पास देण्यात येणार