अयोध्या: भारतरत्न लता मंगशेकर (Lata Mangeshkar) यांना काही दिवसांपूर्वी कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर लता मंगेशकर यांना मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णलयात दाखल करण्यात आले. लता मंगेशकर यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी. लवकरात लवकर त्यांना बरे वाटावे, यासाठी देशभरातील लाखो चाहते प्रार्थना करत आहेत. यातच लता दीदींच्या प्रकृतीसाठी अयोध्येत महामृत्यूंजय मंत्राचा जप करण्यात आला. यावेळी तेथील महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लता मंगेशकरांची भेट घ्यावी, अशी मागणी केली आहे.
लता मंगेशकर यांचे वय ९२ असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अयोध्येमधील आचार्य पीठाच्या तपस्वी छावणीमध्ये महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. महायज्ञ तपस्वी पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य यांच्या नेतृत्वाखाली होम-हवन करण्यात आले. लता मंगेशकर यांना चांगले आरोग्य लाभावे, यासाठी महामृत्युंजय आणि संकटमोचन हनुमानाच्या मंत्रांचा जप करण्यात आला.
PM मोदींनी लता मंगेशकरांची भेट घ्यावी
भारताच्या गानकोकिळा म्हणून जगभर ख्याती असलेल्या गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्ही महामृत्युंजय यज्ञ केला. पंतप्रधान मोदींना विनंती करतो की त्यांनी लता मंगेशकर यांची भेट घ्यावी, असे जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र तरीही त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्या लवकरात लवकर ठीक व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा, अशी माहिती लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतित समदानी यांनी दिली होती.