नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुरू असणाऱ्या सुनावणीदरम्यान आज मुस्लीम पक्षकारांनी हिंदू पक्षकारांवर गंभीर आरोप लावला आहे. हिंदूंनी वादग्रस्त जमिनीवर प्रभू रामाची मूर्ती लपून-छपून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. आज सुनावणीचा 18 वा दिवस आहे. सध्या मुस्लीम पक्षकार सुप्रीम कोर्टात त्यांची बाजू मांडत आहेत. तत्पूर्वी सुनावणीच्या अगोदर सुप्रीम कोर्टाने तामिळनाडूच्या एका सरकारी कर्मचाऱ्याला नोटीस पाठविली आहे. मुस्लीम पक्षकारांची बाजू मांडणारे वकील राजीव धवन यांना धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी त्यांना मिळत असलेल्या धमकीचा कोर्टाच्या सुनावणीत उल्लेख केला. तामिळनाडूतील माजी प्रोफेसर षणमुगम यांना नोटीस जारी केली आहे. ते चेन्नईत राहतात. त्यांनी राजीव धवन यांना फोन करून तुम्ही सुन्नी वक्फ बोर्डाकडून याचिका लढवू नये अशी धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
या सुनावणीच्या दरम्यान राजीव धवन यांनी सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर आणि संविधानाच्या स्थापनेनंतर कोणत्याही धार्मिक स्थळाचं परिवर्तन करण्यात आलं नाही. फक्त स्वयंभू होण्याच्या हवालाने हा निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही की ते स्थान कोणाचं आहे. सुप्रीम कोर्टाने तथ्याच्या आधारावर निर्णय द्यावा. तसेच याठिकाणी चोरून मुर्ती ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच यावेळी अयोध्या वादावर पूर्णविराम लागला पाहिजे. आता रामाच्या नावावर कोणतीही रथयात्रा निघू नये असं सांगत भाजपाकडून 1990 मध्ये रथयात्रा काढल्याने बाबरी विध्वंस झाला होता याचा हवाला देण्यात आला. विवादीत जागेवर मिळालेल्या ढाच्यात शिलालेखावर अल्लाह शब्द लिहिलेला सापडला. बाबरी मस्जिदीमध्ये प्रभू रामाची मूर्ती बसविणे हे हल्ला करण्यासारखं आहे. 1934 मध्ये निर्मोही आखाड्याने अवैधरित्या या जागेवर कब्जा केला होता. त्यानंतर याठिकाणी नमाज अदा करण्यात आली नाही असं त्यांनी सांगितले.
यापूर्वी सुनावणीवेळी मुस्लीम पक्षकारांनी मस्जिदवर हल्ला झाल्याचा उल्लेख केला होता. 1934 मध्ये हिंदूंनी बाबरी मस्जिदवर हल्ला केला त्यानंतर 1949 मध्ये अवैधरित्या घुसखोरी केली आणि 1992 मध्ये बाबरी मस्जिद पाडण्यात आली. त्यामुळे या जागेचं रक्षण करून आम्हाला अधिकार मिळाला पाहिजे असं राजीव धवन यांनी सांगितले होते.