अयोध्येत हनुमानगढीच्या 95 वर्षीय महंताच्या जमिनीवर भूमाफियांनी कब्जा केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महंत जुगल बिहारी दास यांची जमीन होती, मात्र गौरीशंकर याने त्यांना मृत झाल्याचं सांगून कोट्यवधींची ती जमीन बळकावली. महंतांनी सांगितले की, आरोपींनी त्यांना त्यांच्या जमिनीवरून पळवून लावले, बंदुकीचा धाक दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. आता गेली 10 वर्षे स्वत:ला जिवंत असल्याचं सिद्ध करत तेआपली जमीन परत मिळवण्यासाठी कोर्टाच्या चकरा मारत आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या महिन्यात जनता दर्शनादरम्यान जमिनीशी संबंधित तक्रारींवर म्हटले होते की, जर कोणी माफिया एखाद्याच्या जमिनीवर कब्जा करत असेल तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. श्रीराम मंदिरामुळे अयोध्येतील जमिनींचे दर खूप वाढले आहेत. गेल्या वर्षी अयोध्या विकास प्राधिकरणाने 40 बेकायदेशीर भूखंडधारकांची यादी जारी केली होती. या यादीत अयोध्येचे महापौर हृषिकेश उपाध्याय, शहराचे आमदार वेदप्रकाश गुप्ता आणि माजी आमदार गोरखनाथ बाबा यांच्या नावांचा समावेश आहे.
वाद वाढल्यानंतर अयोध्या विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि महापालिका आयुक्त विशाल सिंह यांनी प्राधिकरणाची यादी बनावट असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले होते. अयोध्येतील भाजपा खासदार लल्लू सिंह यांनी गेल्या वर्षी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अधिकारी आणि भूमाफिया यांच्यातील संबंधाबाबत पत्र लिहून एसआयटी स्थापन करून तपास करण्याची मागणी केली होती. त्यांनी लिहिले की, अयोध्येत भूमाफियांचे इतके वर्चस्व आहे.
शहरांमध्ये राहायला इच्छिणाऱ्यांना या जमिनी विकून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. जामथरा घाटापासून गोलाघाटपर्यंतच्या जमिनींवर भूमाफियांचा धंदा फोफावत आहे. त्यांनी लिहिले की, तीन दशकांपासून उत्तर प्रदेश सरकारकडून लीज दिली जात नाही किंवा लीजचे नूतनीकरणही केले जात नाही. काही क्षेत्रातील जमिनीवर फ्री होल्ड नाही, तरीही भूमाफियांनी कोणत्या परिस्थितीत काही क्षेत्रातील जमीन विकली, त्यावर कायमस्वरूपी व तात्पुरत्या लोकांकडून बांधकाम केले जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"