नवी दिल्ली: अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाशी संबंधित 1994 च्या इस्माईल फारुकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. नमाज इस्लामचा अविभाज्य घटक आहे की नाही हा मुद्दा मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या घटनापीठानं दोनास एक असा हा निकाल दिला. नमाज इस्लामचा अविभाज्य घटक आहे, हे प्रकरण आता मोठ्या घटनापीठाकडे जाणार नसल्यानं रामजन्मभूमी प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नमाज इस्लामचं अभिन्न अंग आहे का, याचा निर्णय मोठ्या घटनापीठाकडे सोपवायचा का, यावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे देण्याची गरज नसल्याचा निर्णय न्यायालयानं दिला. हा महत्त्वपूर्ण निकाल देणाऱ्या घटनापीठात तीन न्यायमूर्तींचा समावेश होता. मात्र या प्रकरणात तीन न्यायाधीशांचं एकमत झालं नाही. त्यामुळे न्यायमूर्ती अशोक भूषण, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी त्यांच्या निकालाचं वाचन केल्यावर न्यायमूर्ती नजीर यांनी त्यांच्या निकालपत्राचं वाचन केलं. त्यामुळे अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. 29 ऑक्टोबरपासून या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल.प्रत्येक निर्णय वेगवेगळ्या परिस्थितीत दिला जातो, असं न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी म्हटलं. 1994 मध्ये दिला जाणारा निकाल वेगळ्या परिस्थितीत दिला गेला होता. मशिदीत नमाज अदा करणं इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असा निकाल 1994 च्या इस्माइल फारुकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. मात्र तो निकाल वेगळ्या परिस्थितीत देण्यात आला होता. न्यायालयानं दिलेला तो निकाल म्हणजे धार्मिक भाष्य नव्हतं, असं भूषण यांनी म्हटलं. दीपक मिश्रा यांच्या वतीनं त्यांनी या निकालाचं वाचन केलं. तर न्यायमूर्ती नजीर यांनी हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे जायला हवं, असं म्हटलं होतं.