Ayodhya New Airport Name: श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील विमानतळाचे (Ayodhya Airport) नवे नाव निश्चित झाले आहे. आता अयोध्याविमानतळ ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ नावाने ओळखले जाईल. विशेष म्हणजे, काल(बुधवारी) अयोध्या रेल्वे स्थानकाचे नावही बदलण्यात आले. अयोध्या रेल्वे स्थानक आता ‘अयोध्या जंक्शन धाम’ म्हणून ओळखले जाणार आहे. पूर्वी या विमानतळाचे नाव मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ, असे होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मागणीवरुन रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आले. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 30 सप्टेंबर रोजी अयोध्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी नवीन रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. पीएम मोदींच्या आगमनापूर्वी रेल्वे स्थानक आणि विमानतळाचे नावे बदलण्यात आले आहे.
अयोध्येतील अत्याधुनिक विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात 1,450 कोटी रुपयांहून अधिकचे बांधकाम करण्यात आले आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असून, दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. टर्मिनल इमारतीचा पुढचा भाग राम मंदिराच्या वास्तुकला प्रतिबिंबित करतो.