लखनऊ - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी उत्तर प्रदेशात अयोध्या राम मंदिरासारखं रेल्वे स्थानक उभारण्यात येईल अशी घोषणा केली आहे. मनोज सिन्हा यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मनोज सिन्हा अयोध्येत 210 कोटींच्या वेगवेगळ्या योजनांच्या कामांचा शुभारंभ करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी अयोध्येला अशाप्रकारे विकसित केलं जाईल की, जगाच्या कानाकोप-यातून येणा-या प्रत्येक व्यक्तीला ही राम जन्मभूमी असल्याचा गर्व वाटेल असं म्हटलं आहे.
'विश्व हिंदू परिषदेने जसं राममंदिराचं डिझाइन केलं आहे, अगदी तसंच डिझाइन रेल्वे स्थानकासाठी वापरण्यात येईल', असंही मनोज सिन्हा यांनी यावेळी सांगितलं. देशाच्या काना-कोप-यातून रेल्वे अयोध्येला पोहोचली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासाठी भारत सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
'ज्याप्रकारे अयोध्येचं महत्व आहे त्यानुसार येथील रेल्वे स्थानक नाहीये. लोग देशाच्या कानाकोप-यातून अयोध्येत येतात मात्र रेल्वे स्थानकात त्यांना योग्य त्या सुविधा मिळत नसून ते अपेक्षांवर उतरत नाही', अशी खंत मनोज सिन्हा यांनी व्यक्त केली आहे. आपल्या आगामी योजनांसंबंधी बोलताना मनोज सिन्हा यांनी सध्या सरकार अयोध्य आणि फैजाबाद रेल्वे स्थानकांवर काम करत आहे असं सांगितलं. याअंतर्गत अकबरपुर, फैजाबाद, बाराबंकी रेल्वे लाइनला डबल लेन करण्यासाठी आणि इतर कामांसाठी 1116 कोटी खर्च केले जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी अयोध्या आणि फैजाबाद रेल्वे स्थानकावर अनेक विकास योजनांचा शुभारंभ करत घोषणाही केल्या.