Ayodhya Ram Mandir Acharya Satyendra Nath Das News: उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरातील रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामललावर अभिषेक केला. २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. परंतु, हिंदू पंचांगातील 'तिथी'नुसार यंदाचा वर्धापन सोहळा ११ ते १३ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिराच्या उभारणीनंतर मागील वर्षभराच्या कालखंडात देश-विदेशातील ३ कोटींहून अधिक भक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. या मंदिराचे तीन मजले पूर्ण झाले आहेत. सध्या मंदिराच्या शिखराचे काम सुरू असून, ते दोन महिन्यांत पूर्ण होईल. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया देतान वक्फ बोर्डाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.
वक्फ बोर्डाची प्रत्येक इंच जमीन गरिबांना द्या
वक्फ बोर्डाबाबत आचार्य सत्येंद्र दास यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे समर्थन केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फ बोर्डाला 'माफिया बोर्ड' म्हटले होते. यावर बोलताना आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे विधान बरोबर आहे. क रण वक्फ बोर्डाची बहुतेक जमीन वादग्रस्त राहिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या एका निर्णयाचे स्वागत करताना ते म्हणाले की, प्रत्येक इंच जमीन गरिबांना दिली जाईल.
दरम्यान, आचार्य सत्येंद्र दास यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आणि सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात असूनही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. मुख्यमंत्र्यांचा प्रयागराजमध्येही एक कार्यक्रम होता, परंतु त्यांनी रामलला प्राणप्रतिष्ठा उत्सवाला उपस्थिती लावली, यावरून त्यांचे समर्पण आणि योगदान दिसून येते.