आज अयोध्येमध्ये झालेल्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांचे नेते अनुपस्थित राहिले. मात्र एकीकडे काँग्रेसकडून आजच्या सोहळ्यावर टीका होत असताना दुसरीकडे काँग्रेसशासित राज्यातील एका दिग्गज मंत्र्यांनी मात्र राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आवर्जुन उपस्थिती लावली.
काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशमधील दिग्गज मंत्री विक्रमादित्य सिंह हे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित होते. विक्रमादित्य सिंह हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आहेत. तर त्यांचा आई प्रतिभा सिंह ह्या कांग्रेसच्या हिमाचल प्रदेशमधील प्रदेशाध्यक्षा आहेत. विक्रमादित्य सिंह हे रविवारी लखनौ येथे दाखल झाले होते. त्यांना उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारमध्ये राज्य अतिथीचा दर्जा देण्यात आला होता. देशातील भाजपाशासित राज्यांप्रमाणेच हिमाचल प्रदेशमध्येही प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा करण्यात आली होती.
दरम्यान, अयोध्येमध्ये आज झालेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण काँग्रेससह इंडिया आघाडीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना देण्यात आलं होतं. मात्र यातील बहुतांश नेत्यांनी विविध कारणं देत या सोहळ्यावर टीका करून हे निमंत्रण नाकारलं होतं. मात्र निमंत्रण देण्यात आलेल्या इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.