बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील बहादूरपूर ब्लॉकच्या खैरा गावात राहणारे वीरेंद्र कुमार बैठा उर्फ झमेली बाबा 31 वर्षांनंतर अन्नग्रहण करणार आहेत. हे कारसेवक 31 वर्षांपासून फळं खाऊन आपलं जीवन जगत आहेत. जेव्हा प्रभू श्री राम आपल्या घरात प्रवेश करतील, तेव्हा ते स्वतःच्या हाताने जेवण बनवतील आणि ते अन्न खाऊन आपली तपश्चर्या पूर्ण करतील. झमेली बाबांची 31 वर्षांची तपश्चर्या 22 जानेवारीला पूर्ण होत आहे.
7 सप्टेंबर 1992 रोजी वीरेंद्र कुमार बैठा उर्फ झमेली बाबा यांनी शपथ घेतली होती की, राम मंदिर बांधलं जाईपर्यंत केवळ फळांवरच जगतील. ज्या दिवशी मंदिर बांधलं जाईल आणि रामलल्ला विराजमान होतील, त्या दिवशी अन्नग्रहण करणार. आत्तापर्यंत झमेली बाबा एक छोटंस पान दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यांनी लग्नही केलं नसून समाजासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे.
झमेली बाबा यांनी सांगितलं की, ते लहानपणापासून स्वयंसेवक आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनावरून ते दरभंगा येथून सुमारे अडीचशे कारसेवकांसह अयोध्येला रवाना झाले. सरयू नदीत स्नान केल्यानंतर अयोध्येत भव्य राम मंदिर बांधलं जावं या इच्छेने त्यांनी अन्नत्याग करण्याचा संकल्प केला. यावेळी जवळच्या स्टुडिओत फोटो काढला, तिथे पैसे दिल्यानंतर स्टुडिओ मालकाने तुमचं नाव आणि पत्ता लिहा, तो फोटो पोस्टाने पाठवतो, असं सांगितले. हा फोटो काही दिवसांनी पोस्टाने मिळाला. आजही त्यांनी तो ठेवला आहे.
8 डिसेंबर 1992 रोजी ते आपल्या काही साथीदारांसह अयोध्येहून दरभंगा येथे पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, येथेही पोलीस त्या लोकांचा शोध घेत होते. लहेरियासराय स्थानकावरून रेल्वेमार्गे बलभद्रपूर आरएसएस कार्यालय गाठलं. यानंतर त्यांचा जीव वाचला. झमेली बाबा यांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे. त्यांना राम मंदिराचं निमंत्रण देखील मिळालं आहे. ते आता अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाची पूजा करणार आहेत.