Ayodhya News: अयोध्येत बांधलेल्या भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर रामललाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. हजारोच्या संख्येने रामभक्त मंदिराबाहेर रांग करुन उभे आहेत. गर्दी इतकी वाढलीये की, पोलिसांची टीम अपुरी पडत आहे. दरम्यान, भाविकांच्या आडून कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी ATS कमांडोची टीम आणि RAF मंदिरात तपासणी आणि सुरक्षेसाठी पाठवण्यात आले आहे.
काल, म्हणजेच 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाली. सोहळ्यात उपस्थित व्हीव्हीआयपींना कालच रामललाचे दर्शन घेण्याचा लाभ मिळाला. आजपासून सामान्य भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. पण, भाविकांची इतकी गर्दी होईल, याचा विचारही कुणी केला नव्हता. गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रचंड गर्दी पाहता बाराबंकी पोलिसांनी अॅडव्हायजरी जारी करुन रामभक्तांना अयोध्येच्या दिशेने न जाण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, मंदिरातील वाढती गर्दी पाहून एटीएस आणि आरएएफच्या जवानांना रामलला मंदिराच्या आत पाठवण्यात आले असून, रामललाचे दर्शनही काही काळ थांबवण्यात आले. भाविकांच्या आडून कोणतीही चुकीची घटना घडू नये, यासाठी एटीएस कमांडोची टीम मंदिरात शोध मोहिम राबवत आहे. या गर्दीमुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातही पोलीस सक्रिय झाले आहेत. अयोध्येपासून 60 किमी अंतरावर असलेल्या बाराबंकी येथील पोलिसांनी भाविकांना अयोध्येच्या दिशेने न जाण्याचे आवाहन केले आहे.