मुंबई - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी भाजपासोबतच्या युतीसंदर्भात बोलताना सूचक विधान केले आहे. मतांचं राजकारण बाजूला ठेऊन हिंदुत्वाच्या बाजूने जे पुढे येतील त्यांना सोबत घेऊन जाऊ, असे विधान मनोहर जोशी यांनी केले आहे. हिंदुंनी एकत्र यावे हा आमचा उद्देश आहे. राम मंदिरावरुन मतांचे राजकारण होता कामा नये, असेही जोशींनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येच्या 24 आणि 25 नोव्हेंबर अशा दोन दिवसीय दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी मनोहर जोशी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे मनोहर जोशी असंही म्हणाले की, आज ठाकरे कुटुंबीय चांगल्या कामासाठी बाहेर पडले आहेत. त्यांना यश मिळो हीच प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना आहे. मी 1992 मध्ये अयोध्येला गेलो होते. त्यावेळेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मला निरोप देण्यासाठी सेनाभवनात आले होते. आमचं विमान अयोध्येला न थांबता कोलकात्याला गेले. मी पुन्हा अयोध्येला आलो, पण तोपर्यंत अयोध्येची तारीख उलटून गेली होती. यामुळे तेथे जाणे शक्य झाले नाही. आमचे अपूर्ण राहिलेलं कार्य आज उद्धव पूर्ण करताहेत. त्यांना शुभेच्छा द्यायला मी मातोश्रीवर आलो होता. ही आठवण सांगताना मनोहर जोशी अतिशय भावूक झाले होते.