अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाली. या सोहळ्यानंतर नरेंद्र मोदींनी उपस्थित साधू संत आणि निमंत्रित मान्यवरांना संबोधित केले. या संबोधनादरम्यान, मोदींनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून पूर्ण झालं. आता पुढे काय? असा सवाल करत उपस्थितांसमोर नव्या भारताचा एक संकल्प मांडला. आता आपण याच वेळेपासून पुढील एक हजार वर्षांनंतरच्या भारताची पायाभरणी केली पाहिजे. मंदिर निर्मितीपासून पुढे जाऊन आता आपण सर्व देशवासियांनी या घडीपासून एक समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.
मोदी म्हणाले की, आज अयोध्या भूमी आम्हा सर्वांना, प्रत्येक रामभक्ताला एक प्रश्न विचारत आहे. प्रत्येक भारतीयाला एक प्रश्न विचारत आहे. काही प्रश्न विचारत आहे. श्रीरामांचं भव्य मंदिर उभं राहिलं. आता पुढे काय? शतकांनुशतके ज्याची वाट पाहिली ते आज पूर्णत्वास गेले. आता पुढे काय? आजच्या या शुभघडीला जे दैवी आत्मे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. आम्हाला पाहत आहेत, त्यांना आपण काय असाच निरोप देणार का? नाही, अजिबात नाही. आज मला पूर्ण पवित्र मनाने वाटतं की, काल चक्र बदलत आहे. हा सुखद संयोग आहे की आम्हाला आमच्या पिढीला कालजयी पथाचे शिल्पकार म्हणून निवडलं गेलं. हजारो वर्षांनंतरची पिढी राष्ट्रनिर्माणाबाबतच्या आमच्या कार्याची आठवण काढेल. म्हणून मी सांगतो की हीच योग्य वेळ आहे. आता आपण याच वेळेपासून पुढील एक हजार वर्षांनंतरच्या भारताची पायाभरणी केली पाहिजे. मंदिर निर्मितीपासून पुढे जाऊन आता आपण सर्व देशवासियांनी या घडीपासून एक समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया. रामाचे विचार मानसासोबत जनमानसामध्ये असणं हीच राष्ट्रनिर्मितीची पायरी आहे, असे मोदींनी सांगितले.
यावेळी राम मंदिराच्या उभारणीमुळे सुरू झालेल्या एका नव्या कालचक्राचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, आज आमचे राम आले आहेत. २२ जानेवारी ही आता केवळ कॅलेंडरवर लिहिली गेलेली एक तारीख नाही आहे तर एका नव्या कालचक्राचा उद्गम आहे. आजपासून हजारो वर्षांनंतरही लोक आजच्या या तारखेची आणि या क्षणाची चर्चा करतील. आपल्यावरील ही श्रीरामांची किती मोठी कृपा आहे की आपण हा क्षण नजरेसमोर घडताना पाहतोय. मी आज या दैवी क्षण अनुभवतोय. आमच्या पुरुषार्थामध्ये काहीतर कमी राहिली होती, ज्यामुळे अनेक शतके हे काम पूर्ण झाले नव्हते. त्यासाठी मी प्रभू श्रीरामांची क्षमयाचना केली. मात्र आज ही उणीव भरून निघालीय. प्रभू श्रीराम आम्हाला निश्चितच क्षमा करतील.