लखनऊः 'पहले मंदिर, फिर सरकार' असा नारा देत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्येत पोहोचणार आहेत आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर 'बाण' सोडणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा अजेंडा वरवर पाहता राम मंदिर हा असला, तरी श्रीरामाचा आशीर्वाद घेऊन उत्तर प्रदेशात राजकीय समीकरणं जुळवण्याचाही शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे आणि त्याला आकड्यांचा आधारही आहे.
शिवसेनेनं १९९१ मध्ये उत्तर प्रदेशात निवडणूक लढवली होती. त्यावेळी राम मंदिराचा मुद्दा चांगलाच तापलेला होता. तेव्हापासून गेल्या २७ वर्षांत पक्षानं तिथे १४ निवडणुका लढवल्या, पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, शिवसेनेचा सगळा फोकस महाराष्ट्रावरच होता - आहे. इतर राज्यांमध्ये त्यांच्या शाखा आहेत, पण त्या वाढवण्याच्या दृष्टीने कधीच प्रयत्न झाले नाहीत. विशेषतः बाबरी मशीद पाडल्यानंतर उत्तर प्रदेशात हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने प्रभावी ठरतोय. अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी यशस्वीपणे पाय रोवलेत. पण, हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी, बाबरी मशीद पाडणाऱ्यांची जाहीरपणे पाठ थोपटणारी शिवसेना त्यात मागेच राहिली. आता अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे उत्तरेत शिवसेनेचा झेंडा फडकवतील, याकडे अभ्यासकांनी लक्ष वेधलं.
विश्व हिंदू परिषदेनं राम मंदिराचा मुद्दा लावून धरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही सातत्याने 'मंदिर वही बनायेंगे'चा संकल्प केलाय. त्याचा प्रचंड फायदा भाजपाला झाला. परंतु, मोदी सरकारच्या कार्यकाळातही मंदिर उभारणीच्या दृष्टीनं ठोस काहीच घडलेलं नाही. त्यांच्यावर दबाव आणण्यात संघही अपयशी ठरलाय. नेमकं हेच काम करून राम मंदिराचा मुद्दा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. २०१९च्या निवडणुकांआधी भाजपालाही या विषयासंदर्भात नक्कीच काहीतरी हालचाल करावी लागेल. तेव्हा त्याचं श्रेय शिवसेनेला मिळू शकेल, असं गणितही उद्धव यांच्या डोक्यात असू शकतं.
काही वर्षांपूर्वी भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं परप्रांतियांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांना खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही विरोध केला होता. त्यामुळे यूपीत शिवसेनेची प्रतिमा वेगळी आहे. त्याचाही त्यांना फटका बसतोय. त्यामुळे हे सगळं झालं गेलं शरयू नदीत विसर्जित करण्याचा प्रयत्नही उद्धव ठाकरे नक्कीच करतील.
अर्थात, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची देशभरात 'हवा' करण्यात शिवसेना यशस्वी ठरलीय. परंतु, हा सगळा 'स्टंट' असल्याची टीका-टिप्पणी महाराष्ट्रातील विरोधक करताहेत. त्यामुळे हे 'उत्तरायण' उद्धव यांनी कितपत फायद्याचं ठरतं, याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकांमधून मिळेल.
उत्तर प्रदेशमधील शिवसेनेची कामगिरी
लोकसभा निवडणूकः शिवसेनेने लढवलेल्या जागा१९९१ - ५ जागा १९९६ - २६ जागा१९९८ - ५ जागा१९९९ - १५ जागा२००४ - ९ जागा२००९ - १ जागा२०१४ - ८ जागाएकही जागा जिंकता आली नाही.
विधानसभा निवडणूकः १९९१ - १४ जागा लढवल्या - एक जिंकली१९९३ - १८० जागा लढवल्या१९९६ - २४ जागा लढवल्या२००१ - ३९ जागा लढवल्या२००७ - ५९ जागा लढवल्या२०१२ - ३१ जागा लढवल्या२०१७ - ५९ जागा लढवल्या