Ayodhya Ram Mandir: बालरुपातील रामलला दर्शन घेण्यासाठी अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. दररोज लाखो भक्त रामदर्शन घेत आहेत. तर दानधर्मही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. राम मंदिरात सरासरी ४ कोटी रुपयांचे दान दिले जात असून, आता नोटा मोजण्यासाठी हायटेक मशीन आणण्यात आली आहेत, अशी माहिती देण्यात आली.
अयोध्येत सरासरी २ लाख भाविक रामदर्शन घेत असल्याचे सांगितले जात आहे. राम नवमीला ही संख्या २० लाखांवर जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. भव्य राम मंदिरात भाविकांकडून मुक्त हस्ताने दान दिले जात आहे. भाविकांना दान देणे सोयीचे जावे, यासाठी मंदिरात ०६ दानपात्रे आणि १० दान काऊंटर्स ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये लाखो रुपयांचे दान पडत असून, याची सरासरी ४ कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. हे पाहता दानातील नोटा मतमोजणीसाठी हायटेक मशीन सुरू करण्यात आले आहे.
मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांत दान-देणगीची सरासरी रक्कम सुमारे ४ कोटींवर पोहोचली आहे. जी रामनवमीपर्यंत आणखी वाढू शकते. या दानाचे हाती मोजमाप करण्यात मोठ्या समस्या येत आहे. काऊंटिंग विभागाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच स्टेट बँकेने नोटांचे वर्गीकरण आणि मोजणीसाठी मंदिर परिसरात दोन हायटेक स्वयंचलित मोजणी यंत्रे बसवली आहेत.
दान-देणगी म्हणून मिळालेल्या १० रुपये, २० रुपये, ५० रुपये, १०० रुपये, २०० रुपये आणि ५०० रुपयांच्या नोटा बॉक्समध्ये टाकल्या जातात. मशीन सर्व प्रकारच्या नोटा वेगवेगळ्या करून १०० च्या बंडलमध्ये पॅक करून बाहेर टाकते. त्यामुळे नोटांची हाती मोजणी आणि वर्गीकरणासाठी लागणारा वेळ कमी झाला आहे. बँक कर्मचारी आणि मंदिर ट्रस्टचे मोजणी प्रभारी पथक हे बंडल तपासतात आणि बँकेत जमा करतात.
मंदिर ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात देणगी देण्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी १० संगणकीकृत काऊंटर उभारण्यात आले आहेत. याशिवाय रामललासमोर ६ मोठ्या दानपेट्याही ठेवण्यात आल्या आहेत. रामललाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक आपली देणगी थेट दानपेटीत टाकतात.
दरम्यान, देणग्या वाढल्याने सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुविधांनी सुसज्ज असलेल्या मोठ्या मोजणी कक्षाची गरज भासत असून, याचीही व्यवस्था लवकरच केली जाईल, असे सांगितले जात आहे. राम मंदिरात दिलेल्या देणगीची मोजणी व जमा करण्याची संपूर्ण जबाबदारी आता बँकेकडे सोपविण्याचा विचार मंदिर ट्रस्ट करत असल्याची चर्चा आहे. मंदिर ट्रस्टच्या समन्वयकांच्या टीमच्या सहकार्याने बँक हे काम करणार आहे. या प्रणालीचा विस्तार करण्यासाठी बँक आणि ट्रस्ट कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवतील, असे म्हटले जात आहे.