Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर रामभक्त रामललाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. आतापर्यंत लाखो भाविकांनी रामदर्शन घेतले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. यातच आता राम मंदिरात रामलला प्रभूंचे दर्शन घेणे आणखी सुलभ होणार आहे. एका नवीन व्यवस्थेनुसार, श्रीराम मंदिर ट्रस्टकडून आता दररोज २४०० पास देण्यात येणार आहेत.
श्रीराम मंदिरात रामदर्शन घेण्यासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन भक्तांच्या सोयीसाठी राम मंदिर ट्रस्टने नवी सुविधा निर्माण केली होती. यामुळे आता रामदर्शनासाठी भक्त थेट रांगेत प्रवेश करू शकतात. कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू न बाळगता आराध्याचे दर्शन घेऊ शकतात. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी दररोज २४०० पास जारी केले जाणार आहेत. पासधारकांसाठी दर्शनाची वेळही निश्चित केली जाईल. पासधारकांना ६ टप्प्यांमध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन, पूजन करण्याची संधी मिळेल. प्रत्येक टप्प्यात ३०० पास आणि १०० स्पेशल पास दिले जाणार असून, ही नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
दिवसभरात दोन-दोन तासांच्या टप्प्यात दिले जाणार पास
श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कॅम्प ऑफिस प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी या नवीन व्यवस्थेबाबत बोलताना सांगितले की, श्रीराम भक्तांना सहज दर्शन घेता यावे यासाठी दोन-दोन तासांच्या बॅच निश्चित करण्यात आल्या आहे. एका दिवसात ६ टप्प्यात रामदर्शन करता येणार आहे. पहिला टप्पा सकाळी ७ ते ९, दुसरा ९ ते ११, तिसरा १ ते ३, चौथा ३ ते ५, पाचवा ५ ते ७ आणि शेवटचा सहावा ७ ते ९ अशी व्यवस्था असेल. यामध्ये विशिष्ट पास देण्यात येतील. प्रत्येक टप्प्यात ४०० पास दिले जातील. यातील ट्रस्ट आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी १०० पास राखीव असतील. ३०० पासांपैकी २०० पास ऑनलाइन दिले जातील आणि १०० पास काउंटरवर मिळतील. या नवीन व्यवस्थेमुळे श्रीरामाचे दर्शन सहज मिळू शकेल, असे प्रकाश गुप्ता म्हणाले.
दरम्यान, बालस्वरुपातील रामलला यांना विश्रांती मिळत नव्हती. यामुळे दुपारी १२ ते १ या वेळेत रामदर्शन थांबवण्यात आले होते. रामलला प्रभूंना आराम मिळत नसल्यामुळे राम मंदिर ट्रस्टकडून यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार होता. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर प्रथमच रामदर्शन दिवसभरात काही वेळासाठी बंद ठेवण्यात आले होते.