नवी दिल्ली:दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ISIS च्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. या दहशतवाद्याची कसून चौकशी करताना अतिशय महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. अयोध्येतील राम मंदिर, मुंबईतील काही ठिकाणे आणि देशातील बडे नेते टार्गेटवर असल्याचा मोठा खुलासा या दहशतवाद्याने केला आहे. यानंतर संरक्षण यंत्रणा सतर्क झाली असून, या दहशतवाद्याकडून आणखी माहिती मिळते का, याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पकडलेल्या दहशतवाद्याचे नाव शाहनवाज उर्फ शैफी, त्याचे साथीदार रिझवान आणि अरशद यांना अटक केली. या तिघांची चौकशी करत असताना मुंबईतील मरीन ड्राइव येथील तसेच कुलाबा येथील काही ठिकाणे, अयोध्येतील राम मंदिर आणि देशातील बडे नेते टार्गेटवर होते. यासाठी या तिघांना मिशन दिले होते, अशी कबुली या दहशतवाद्यांनी दिली.
पुण्यातील काही ठिकाणांची केली होती रेकी
दहशतवाद्यांनी पुण्याजवळील पश्चिम घाटाची रेकी केली होती. मात्र, हल्ल्याचा दिवस निश्चित केला नव्हता. दहशतवाद्यांनी एका विशिष्ट दिवशी हल्ला करण्याची योजना आखली होती. दहशतवादी २६/११ पेक्षा मोठे नुकसान करण्याचा कट रचत होते, असे सांगण्यात येत आहे. शाहनवाजची पत्नी स्पेशल सेलच्या रडारवर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहनवाजप्रमाणे तीही कट्टरपंथी आहे. शाहनवाजची पत्नी आधी हिंदू होती, पण नंतर तिने तिचा धर्म बदलला, असे म्हटले जात आहे.
दुचाकी चोरताना अटक आणि स्लीपर सेल असल्याचा मोठा खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी इम्रान आणि युसूफला मोटरसायकल चोरी करताना पकडले. पुणे पोलिसांना ते किरकोळ चोर वाटत होते. मात्र, त्यावेळी शाहनवाज घटनास्थळावरून पळून गेल्याचे चौकशीत उघड झाले. यावेळी शाहनवाजचे नाव पहिल्यांदा समोर आले. अधिक तपासात हे चोर आयएसआयएसचे दहशतवादी असून स्लीपर सेल असल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलीस शाहनवाजच्या घरी पोहोचले. तेथून आयईडी बनवण्यासाठी वापरलेले साहित्य, पिस्तुल जप्त करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्र एटीएसकडे वर्ग करण्यात आले. एटीएसने आणखी काही जणांना अटक केली. यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले.
दरम्यान, चौकशीत हे सर्वजण ऑनलाइन पद्धतीने वेगवेगळ्या संस्थांशी जोडलेले असल्याचे समोर आले आहे. या लोकांनी अहमदाबाद येथेही रेकी केली होती. दिल्लीतील हजारीबाग येथील रहिवासी असलेल्या शाहनवाजने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. शाहनवाजला बॉम्ब निर्मितीबाबत माहिती होती. त्याने बॉम्ब बनवण्याचे अनेक प्रयोग केले. एवढेच नव्हे तर पुण्यातील जंगलात स्फोट घडवण्याचा सराव केला होता. शाहनवाजचे दोन्ही साथीदार सुशिक्षित आहेत. झारखंडचा रहिवासी असलेल्या अरशदने अलीगड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. उत्तर प्रदेशातील आझमगड येथे राहणारा रिझवानने कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले आहे, अशी माहिती समोर आली आहे.