इंदूर : उत्तर प्रदेशातील अयोध्येत असलेल्या राम मंदिराच्या उभारणीसाठी लागणाऱ्या साहित्याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी मोठं विधान केलं आहे. राम मंदिराच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक साहित्याचे पैसे आम्ही दिले आहेत. मंदिराच्या उभारणीसाठी आणलेल्या साहित्यावर सरकारला जवळपास ४०० कोटी रुपयांचा जीएसटी मिळणार आहे, असं चंपत राय यांनी सांगितलं.
मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित एका कार्यक्रमात चंपत राय यांनी ही माहिती दिली. इंदूरमधील एका कार्यक्रमादरम्यान राममंदिर जन्मभूमी तीर्थ ट्रस्ट क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी मंदिर उभारणीसाठी खर्च झालेल्या पैशांबाबत विधान केलं. मंदिरात लागणाऱ्या प्रत्येक साहित्याचे पैसे आम्ही दिले असल्याचे त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, राम मंदिराच्या उभारणीसाठी आम्ही देशभरात ४२ दिवसांची समर्पण निधी अभियान सुरू केले होते.
४२ दिवसांत २८०० कोटी रुपयेचंपत राय यांनी सांगितले की, ४२ दिवसांच्या समर्पण अभियानादरम्यान देशातील १० कोटी जनतेने देवावर श्रद्धा दाखवली आणि मंदिराच्या बांधकामासाठी पैसे दिले. लोकांनी ४२ दिवसांत २८०० कोटी रुपयांची देणगी दिली. मंदिराच्या उभारणीत लोकांनी केवळ मदतच केली नाही तर सरकारला सहकार्यही केले आहे. लोकांनी दिलेल्या पैशातून मंदिर उभारणीसाठी साहित्य आणले. त्यातून सरकारला जीएसटीच्या रूपाने कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. तसेच, भारत सरकारने मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्टच्या बदल्यात एक रुपया दिला होता. जो फ्रेम करून मंदिराच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आला आहे, असंही चंपत राय यांनी सांगितलं.
सर्व साहित्याचे पैसे दिलेचंपत राय यांनी कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना सांगितलं की, मंदिरात बसवलेल्या दगड आणि लाकडासाठी पैसे देण्यात आले आहेत. दरम्यान, राम मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानातून दगड आणण्यात आले होते आणि लाकूड महाराष्ट्रातून आणण्यात आले होते. या ठिकाणी मंदिराच्या उभारणीसाठी लागणारे साहित्य विविध शहरे व राज्यांतून आणले जात होते. याबाबत चंपत राय म्हणाले की, सर्व साहित्याचे पैसे दिले आहेत. तसंच, राम मंदिर आंदोलन हे स्वातंत्र्यलढ्यापेक्षा कमी नाही, असंही चंपत राय म्हणाले.