नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीच्या वादावर समाधानकारक तोडगा काढण्यात मध्यस्थ समिती अपयशी ठरली आहे. त्यामुळे या प्रकरणाची नियमित सुनावणी ६ आॅगस्टपासून घेण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सुनावणी सुरूच राहील, असेही न्यायालयाने सांगितले.
जमिनीच्या वादावार तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने न्या. एफ. एम. आय. कैफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्या समितीने आपला अहवाल न्यायालयाला सादर केला. त्यानंतर समितीला तोडगा काढण्यात अपयश आल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. समितीने जो अहवाल दिला, त्यातून दोन पक्षकारांमध्ये तोडगा निघालेला नाही, असे आढळून आले आहे, असे ते म्हणाले. या खंडपीठात न्या. गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचुड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. ए. नझीर यांचा समावेश आहे. न्या कैफुल्ला समितीला अपयश आल्यास नियमित सुनावणी घेण्याचे न्यायालयाने याआधीच स्पष्ट केले होते.आठवड्यातून तीन दिवसही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आठवड्यात तीनदा होणार आहे. मंगळवार, बुधवार व गुरुवारी हे ते तीन दिवस असतील. न्यायालयाने न्या कैफुल्ला समितीही बरखास्त करण्याचे न्यायालयाने नमूद केले. या सुनावणीसाठी सर्व संबंधितांनी कागदपत्रे तयार ठेवावीत, असेही न्यायालयाने सांगितले आहे.