Ayodhya Ram Mandir Ram Navami News: अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरातील भाविकांची रीघ कमी होताना दिसत नाही. रामललाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भाविकांकडून सढळ हस्ते दान, देणगीही दिली जात आहे. श्रीराम मंदिरात वर्षभरात काही सण, उत्सव साजरे केले जाणार आहेत. एप्रिल महिन्यात येणाऱ्या रामनवमीला अयोध्येत भाविकांचा महासागर लोटणार असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट तयारीला लागले आहे.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे डॉ. अनिल मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच रामनवमीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकांच्या चर्चांना दुजोरा दिला. रामनवमीनिमित्त अयोध्येत मोठी गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेपासून ते भाविकांना सहज दर्शन मिळावे, कोणत्याही प्रकारची समस्या, अडचण येऊ नये, याची काळजी घेण्यापर्यंत सर्व मुद्द्यांवर विचारमंथन करून आराखडा तयार केला जात आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः आढावा घेत आहेत
मिश्रा यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः प्रत्येक पैलूवर लक्ष ठेवून आहेत. तसेच तीर्थक्षेत्र सर्व भाविकांसाठी सर्वोत्तम व्यवस्थापनाचे नियोजन करत आहे. श्रीराम मंदिर परिसरात स्टीलचे तात्पुरते बॅरिकेट्स लावले जात आहेत. तसेच भाविकांसाठी पर्यायी मार्गांचाही विचार केला जात आहे. तीव्र उन्हामुळे जमीन अधिक तापेल, यामुळे भाविकांना काही त्रास होऊ नये, यासाठी मॅट टाकण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या स्थायी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व उच्चपदस्थ अधिकारी, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्रा यांच्यासह अन्य सदस्य, विश्वस्त उपस्थित राहणार आहेत.