अयोध्या: अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिराच्या जमिनीत कथित गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. काँग्रेससह अन्य विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह निगडीत संस्थांवर टीका केल्यानंतर आता या वादात अयोध्येतील साधुंनी उडी घेतली आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि शिवाय भाजपचे वरिष्ठ नेतेही आहेत. त्यामुळे हा जमीन घोटाळा का झाला, अशी विचारणा अयोध्येतील साधुंनी केली आहे. (ayodhya sadhu asked pm narendra modi over ayodhya land deals)
उत्तर प्रदेशमध्ये आगामी काही महिन्यांत विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. भाजपसह अन्य पक्षांनी यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि रा.स्व.संघासाठी राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा होता. राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राम मंदिर ट्रस्टकडून झालेल्या जमीन खरेदी व्यवहाराबाबत आता प्रश्न विचारले जात आहेत. अयोध्येतील जमीन खरेदीत झालेला कथित गैरव्यवहार समोर आल्याने आता पंतप्रधाननरेंद्र मोदींनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी मागणी अयोध्येतील साधुंनी केली आहे.
“RSS च्या इशाऱ्यावर मोदी सरकार आरक्षण संपविण्याचे काम करतेय”; काँग्रेसचा आरोप
पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे
निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी या जमिनीच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही जमिनी, ज्या काही तास किंवा काही आठवड्यांपूर्वी खरेदी केल्या असतील. मात्र, राम मंदिर ट्रस्टला त्या अधिक किमतीला विकल्या गेल्या आहेत. याचे लाभार्थी भाजपशी संबंधित आहेत. अशा दोन घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे वरिष्ठ नेते असल्याच्या नात्याने, हा घोटाळा का झाला, याचे उत्तर द्यायला हवे, अशी मागणी महंत धर्मदास यांनी केली आहे.
“उत्तर प्रदेशची जनता भाजपला कंटाळलीय, आम्ही ५ वर्षांत ५ मुख्यमंत्री देऊ”
दरम्यान, २ कोटीमध्ये जमीन खरेदीचा व्यवहार झाला त्याच दिवशी साडे १८ कोटी एग्रीमेंट झाले. या व्यवहारात ट्रस्टी अनिल मिश्रा आणि महापौर ऋषिकेश उपाध्याय साक्षीदार आहेत. १८ मार्च २०२१ रोजी १० मिनिटापूर्वी जी जमीन २ कोटीत खरेदी केली त्याच जमिनीवर करार करण्यात आला. जी जमीन २ कोटी खरेदी केली त्याच जमिनीवर १० मिनिटांत साडे १८ कोटींचा करार कसा झाला? तसेच १० मिनिटांत असं काय झालं की २ कोटींची जमीन साडे १८ कोटींची झाली?, असा सवाल अयोध्येतील माजी आमदार आणि सपा सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले तेज नारायण पांडे उर्फ पवन पांडे यांनी प्रथम उपस्थित केला.