अयोध्या - अयोध्येतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आज प्रयागराज येथील विशेष कोर्टात पाच दहशतवाद्यांविरोधात शिक्षेची सुनावणी होणार आहे. राम जन्मभूमी येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा सुनावली जावी अशी मागणी अयोध्येतील नागरिकांची आहे. 5 जुर्ले 2005 रोजी सकाळी 9.15 च्या सुमारास दहशतवाद्यांनी रामजन्मभूमी परिसरात ब्लास्ट केला होता. जवळपास अडीच तास चाललेल्या चकमकीत पोलिसांनी 5 दहशतवाद्यांना ठार मारलं होतं. या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीर येथे अटक केली होती.
अटक केलेल्या 4 दहशतवाद्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. 2006 मध्ये प्रयागराजच्या विशेष कोर्टाच्या आदेशावर त्यांना प्रयागराजच्या सेंट्रल जेलमध्ये पाठविण्यात आलं होतं. रामजन्मभूमी परिसरात हल्ला करुन देशामध्ये धार्मिक हल्ले घडविण्याचं षडयंत्र या दहशतवाद्यांनी आखलं होतं. 5 जुलै 2005 रोजीचा हा हल्ला रामनगरीमधील इतिहासातील काळा दिवस आहे.
या दहशतवादी हल्ल्यावेळी अयोध्यानगरीत खळबळ माजली होती. लोक पूजा करण्यात व्यस्त होते. दहशतवादी हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी कडू आठवणींनी भयभीत होतात. या हल्ल्यातील आरोपींना आज शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. मात्र या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत घातपात होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे अयोध्येत हायअलर्ट देण्यात आला आहे. राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांचा जागता पहारा असणार आहे.
गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार नेपाळमार्गे काही दहशतवादी भारतात घुसले असून अयोध्येला ते निशाणा बनविण्याची शक्यता आहे. अयोध्येतील प्रमुख ठिकाणे, हॉटेल, धर्मशाळा या सर्व परिसरात सुरक्षा यंत्रणांनी नाकाबंदी केली आहे. तसेच शहरात येणाऱ्या ट्रेन्स, बसेसची तपासणी केली जात आहे. 5 जून 2005 रोजी अयोध्येत हल्ला करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं. तसेच या हल्ल्याचं षडयंत्र रचणाऱ्या 4 दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या 18 खासदारांसह अयोध्येच्या दौऱ्यावर गेले होते. हायअलर्टच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने उद्धव ठाकरेंना राज्य अतिथीचा दर्जा दिला होता. त्यामुळे राज्यात त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली होती.