अयोध्या : यंदा रामनवमीला अयोध्येत दोन लाखांहून अधिक दिवे लावले जाणार असून रामकथा पार्कसमोरील घाट तसेच अन्य ठिकाणी यासाठी व्यवस्था असेल. रामकथा पार्कमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी साजऱ्या होत असलेल्या रामनवमीनिमित्त वाहतूक तसेच सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली असून, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अवजड वाहने पूर्वाचल एक्स्प्रेस-वेवरून पाठविली जातील. ही व्यवस्था महाकुंभच्या धर्तीवर करण्यात आली आहे.
सुरक्षा व्यवस्थेत विशेष पोलिस पथक तसेच सोबत निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात आहेत. शरयू नदीच्या किनारी पोलिस, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके आणि राज्य आपत्ती निवारण पथकांना सज्ज ठेवले आहे.
उष्णतेपासून बचावासाठी ठिकठिकाणी थंड पाणीराममंदिर आणि हनुमानगढीसह सर्व प्रमुख स्थळांवर सावली आणि आराम करता यावा यासाठी व्यवस्था असेल. सर्व प्रमुख ठिकाणी पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध असेल. या उत्सवादरम्यान विविध ठिकाणी तात्पुरती आरोग्य केंद्रे असतील. या ठिकाणी ओआरएसची व्यवस्था करण्यात आली आहे. राममंदिरात दर्शनासाठी देण्यात आलेले विशेष पास सकाळी ९ ते १२ या काळात रद्द असतील. या काळात सामान्य भक्तांना दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून प्राधान्य दिले जाणार आहे.