नवी दिल्ली : गेल्या तीन दशकांत देशातील राजकीय आणि सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव पाडणाऱ्या अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात पूर्ण होणार आहे.
या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. सर्व पक्षकारांनी आपली बाजू लिखित स्वरुपात सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. यावेळी हिंदू माया सभेच्या पक्षकाराकडून सुनावणीसाठी आणखी काही वेळ मागितला होता. मात्र, या प्रकरणी सुनावणी आजच पूर्ण होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले. रंजन गोगोई म्हणाले, 'पुरे झाले आता, सुनावणी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण होईल.'
नाट्यमय घडामोडी, धवन यांनी नकाशा फाडला...आजच्या सुनावणीवेळी नाट्यमय घडामोडी पाहयला मिळाल्या. राम मंदिरवर हिंदू महासभेच्या वकिलांनी ऑक्सफोर्ड पुस्तकातील नकाशाचा हवाला दिला. यावेळी मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी या पुस्तकाचा नकाशा फाडला. त्यामुळे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'जर असेल होत असेल तर आम्ही उठून जाऊ.'
काल झालेल्या सुनावणी दरम्यान अयोध्येतील राम जन्मभूमीच्या जागेवर मशीद बांधण्याची बाबराने केलेली ‘ऐतिहासिक चूक’ होती. हिंदूंची पुरातन काळापासूनची श्रद्धा लक्षात घेऊन, त्या वादग्रस्त जागेवरील हिंदूंचा हक्क मान्य करून ती चूक सुधारण्याची गरज आहे, असे आग्रही प्रतिपादन हिंदू पक्षकारातर्फे सर्वोच्च न्यायालयात केले गेले. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या विशेष पीठापुढे 39व्या दिवशी महंत मोहन दास या पक्षकाराच्या वतीने अॅड. के. पराशरन यांनी युक्तिवाद केला. या जागेच्या मालकीसंबंधी उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने केलेल्या दिवाणी दाव्यात महंत मोहनदास प्रतिवादी आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आजचा सुनावणीचा 40 वा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेतेसाठी 200 शाळा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कालमर्यादा निश्चित केली असून, सर्व पक्षकारांना 17 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा अंतिम निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.