अयोध्येतील वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी अयोध्येतच मोक्याची पाच एकर जागा द्यावी, असा ऐतिहासिक निकाल आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. या निकालाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वागत केलं आहे आणि सर्वांनाच एकत्र येण्याची सादही घातली आहे.
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल न्याय देणारा आहे. या निकालाकडे कुणीही जय-पराजय म्हणून पाहू नये. उलट, भूतकाळात जे घडलं ते विसरून आपण सगळे एकत्र येऊ या, असं आवाहन त्यांनी केलं. देशवासीयांनी घटनेच्या मर्यादेत राहून आपला आनंद व्यक्त करावा, असंही त्यांनी म्हटलंय.
अनेक दशकं चाललेल्या अयोध्या खटल्यातील प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार झाला. सर्व पक्षांनी मांडलेल्या मुद्द्यांचं मूल्यांकन करून न्यायमूर्तींनी आणि वकिलांनी सत्य आणि न्यायाची बाजू समोर आणली त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, अशा भावना मोहन भागवत यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. सर्व सहकारी आणि बलिदान देणाऱ्यांचं स्मरणही त्यांनी केलं. कायदा-सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी सरकारी पातळीवरून झालेले प्रयत्न आणि प्रत्येक व्यक्तीनं दाखवलेल्या सामंजस्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.